शाहरुख खान आणि त्याचा आगामी चित्रपट ‘पठाण’ हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. तब्बल ४ वर्षांनी शाहरुख पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. याबरोबरच शाहरुख ‘कोलकाता नाइट रायडर्स’ या आयपीएल टीमचा मालक आहे. त्याच्याबरोबरच अभिनेत्री जुही चावलादेखील यात भागीदार आहे. आयपीएलमध्ये टीम विकत घेतल्यानंतर त्याला आलेले अनुभव शाहरुखने नुकतंच एका मुलाखतीमध्ये सांगितले आहेत.
२०१४ साली लागलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे ‘आयपीएल’चे सामने आबू धाबीमध्ये खेळवले गेले होते. तेव्हा शाहरुखची टीम लागोपाठ हरत होती आणि त्याच अनुभवाबद्दल शाहरुखने सांगितलं आहे. रॉबिन उथप्पाशी संवाद साधताना शाहरुखने सामना हरल्यावर त्याला नेमकं कसं वाटायचं आणि तो काय करायचा याबद्दल खुलासा केला आहे.
शाहरुख म्हणाला, “२०१४ च्या अबू धाबीमधील सामन्यांना सुरुवात झाली आणि जेव्हा आपण बहुतेक सामने हरत होतो तेव्हा मला चांगलं आठवतं, मी माझ्या लहान मुलांना कवटाळून हॉटेलच्या रूमवर भरपूर रडायचो. त्यावेळी संघ पराभूत होताना पाहून आम्हाला खूप दुःख व्हायचं. पण नंतर जेव्हा पुढील काही सामने भारतात खेळवले गेले तेव्हा मात्र संघाचा खेळ पाहून थोडं हायसं वाटलं.”
इतकंच नाही तर तेव्हा पंजाबच्या संघाला हरवून शाहरुखच्या कोलकाता संघाने ‘आयपीएल ट्रॉफी’वर स्वतःचं नाव कोरलं होतं. केकेआरचे सामने बघून शाहरुखला प्रचंड प्रेरणा मिळायची आणि बऱ्याचदा तो निराशही व्हायचा असंही त्याने या मुलाखतीमध्ये सांगितलं. शाहरुखचा ‘पठाण’ २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत.