बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा सध्या चांगलाच चर्चेत असतो. शाहरुखचा ‘पठाण’ हा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. त्याच्या वाढदिवशी ‘पठाण’चा टीझर प्रदर्शित करून शाहरुखने त्याच्या चाहत्यांना खुश केलं. या टीझरला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. तब्बल ३ वर्षांनी शाहरुख मोठ्या पडद्यावर झळकणार आहे यासाठी त्याचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत. नुकतंच शाहरुखला शारजाह मध्ये एक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘शारजाह इंटरनॅशनल बूक फेअर’ या सोहळ्यात शाहरुखचा चित्रपटसृष्टीतील योगदान आणि ग्लोबल आयकन महणून गौरव करण्यात आला. यानिमित्ताने शाहरुखची एक छोटीशी मुलाखतही घेण्यात आली. यामध्ये शाहरुखने त्याच्या स्ट्रगलविषयी आणि एकूणच चित्रपटातील कारकीर्दीविषयी गप्पा मारल्या. शाहरुखचे आई वडील दोघेही तो स्टार बनण्याआधीच निधन पावले याची खंतही त्याने व्यक्त केली, पण याबरोबरच त्याचे आई वडील आज असते तर त्यांना शाहरुखची एक गोष्ट प्रचंड आवडली असती, त्या गोष्टीबद्दल खुद्द शाहरुखनेच स्पष्टीकरण दिलं आहे.

आणखी वाचा : “वैद्यकीय सल्ल्याशिवाय व्यायाम…” सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या निधनानंतर विवेक अग्निहोत्री यांचं ट्वीट

शाहरुख म्हणाला, “माझी आई जर आज असती तर ती सर्वप्रथम मला म्हणाली असती. तू खूपच बारीक झाला आहे, चेहेरा पण अगदी सुकलाय, जरा चांगलं खात जा आणि वजन वाढव.” हे शाहरुख खरंतर मस्करीत म्हणाला, पण आपल्या आई वडिलांना आपल्या एका गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटला असता याबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला, “मी आयुष्यात एक गोष्ट उत्तमरित्या पार पाडली आहे असं मला वाटतं आणि माझे आई वडील आज असते तर त्यांनाही त्याचा अभिमानच वाटला असता. ती गोष्ट म्हणजे आमच्या तीनही मुलांची जडणघडण. आम्ही त्यांना ज्या पद्धतीने वाढवलं आहे ते पाहून नक्कीच त्यांना अभिमान वाटला असता.”

शाहरुख खानने गौरीशी विवाह केला असून त्यांना ३ मुलं आहेत. त्यापैकी अब्राम हा लहान आहे. सुहाना खान लवकरच ओटीटीमधून मनोरंजनविश्वात पदार्पण करणार आहे. आर्यन खानही लवकरच या विश्वात पाऊल ठेवणार आहे. मध्यंतरी एका ड्रग केसप्रकरणी आर्यन खानला अटक झाली होती. यावेळी त्याच्यावर आणि शाहरुखवर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड टीका झाली होती. या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच आर्यन खानला क्लीन चीट मिळाली आहे.