१९९३ साली ‘बाजीगर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. ‘बाजीगर’मधील शाहरुख खानने साकारलेली खालनायकाची भूमिका आजही चित्रपटसृष्टीतील त्याच्या करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. त्यावेळी चित्रपटसृष्टीत नवीन असलेल्या शाहरुखसाठी ही भूमिका साकारणे एक मोठे आव्हान होते. परंतु ही नकारात्मक भूमिका साकारत तो एक चतुरस्त्र अभिनेता आहे हे त्याने सगळ्यांसमोर सिद्ध केले.
आता हा चित्रपट पुन्हा ३० वर्षांनी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित केला जाणार आहे. ‘बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइड’च्या रिपोर्टनुसार सिनेपोलिज या मल्टीप्लेक्स चेनने ‘रेट्रो फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. या फेस्टिव्हलदरम्यान तब्बल २५ सिनेपोलीज थिएटर्समध्ये किंग खानचा ‘बाजीगर’ पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे.
आणखी वाचा : अजय देवगण, आर माधवनचा ‘शैतान’ लवकरच गाठणार १०० कोटींचा टप्पा; पाचव्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
‘बाजीगर’बरोबरच बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारचा ‘खिलाडी’ आणि ‘मै खिलाडी तू अनाडी’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या तीनही चित्रपटांचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. यामध्ये ‘बाजीगर’चं जबरदस्त अॅडव्हान्स बुकिंग सर्वात जोरदार सुरू आहे. काही चित्रपटगृहात तर ‘बाजीगर’चं हाऊसफुल्ल बुकिंग झालं आहे. या चित्रपटात शाहरुखने नकारात्मक भूमिका निभावली होती.
या चित्रपटाने शाहरुखच्या करिअरला एक वेगळंच वळण दिलं. प्रेक्षकांनाही शाहरुखचा हा अवतार प्रचंड आवडला. चित्रपटातील संवाद आणि गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. या चित्रपटासाठी शाहरुखला उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. आता पुन्हा ३० वर्षांनी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना पाहायला मिळणार आहे. सिनेरसिक आणि शाहरुख खानचे चाहते यासाठी फारच उत्सुक आहेत.