२०२३ हे वर्ष हे चित्रपट प्रेमींसाठी खूप खास असणार आहे. पुढील वर्षी अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज होत आहेत. यात शाहरुख खान, अल्लू अर्जुन, सलमान खान, विकी कौशल यांसारख्या अभिनेत्यांच्या चित्रपटांची नावे सामील आहेत. सध्या अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा बदलत असताना शाहरुख खान आणि अल्लू अर्जुन यांच्यात मात्र सामना रंगताना दिसणार आहे. याचं कारण म्हणजे, यांचे चित्रपट पुढील वर्षी आमने-सामने येणार आहेत.
शाहरुख खानचे चाहते त्याच्या ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ या तिन्ही चित्रपटांची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’च्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.
आणखी वाचा : आलिया-रणबीर पाठोपाठ वरुण धवन-नताशाही होणार आई-बाबा? सलमान खानने दिले संकेत
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुखने सांगितले की, हे आगामी चित्रपट सुपरहिट होणार याची त्याला खात्री वाटते. तसेच साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर हा दुसरा भागही तुफान गाजणार यासाठी या चित्रपटाची टीम मेहनत घेत आहे. नुकतीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
हेही वाचा : “माझे आगामी चित्रपट सुपरहिटच होणार कारण…”; शाहरुख खानने व्यक्त केला विश्वास
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘पुष्पा: द रुल’ २०२३च्या ख्रिसमसला प्रदर्शित होऊ शकतो. तर, शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपटही याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. आजकाल एकाच दिवशी चित्रपटांचं प्रदर्शन नको यासाठी निर्माते प्रयत्न करताना दिसत आहेत. दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यामुळे होणारी टक्कर टाळण्यासाठी अनेक निर्माते चित्रपटांच्या तारखा बदलताना दिसत आहेत. अशातच हे दोन बिग बजेट आणि बहुप्रतीक्षित चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले तर दोन्ही चित्रपटांसाठी ही स्पर्धा अडचणीची ठरू शकते. त्यामुळे आता हे चित्रपट आमने-सामने येणार की यातील एका चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली जाणार हे येत्या काही दिवसात समोर येईल.