बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’, ‘जवान’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर ‘डंकी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख बरोबर अभिनेत्री तापसी पन्नू, विक्की कौशल महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ‘डंकी’ चित्रपटाचा टीझर, ट्रेलर आणि दोन गाणी आधीच प्रदर्शित झाली आहेत ज्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
नुकतंच चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून लोकांनी चांगला प्रतिसाद याला दिला आहे. उत्तरेकडील बऱ्याच राज्यात चित्रपटाला सर्वाधिक स्क्रीन्स मिळाल्या आहेत यामुळे तिथे हा चित्रपट चांगलीच कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे. मुंबईमध्येसुद्धा शाहरुख खानच्या ‘डंकी’ची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल; या कारणामुळे खालावली प्रकृती, डॉक्टरांचे उपचार सुरू
किंग खानचे चाहते फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी झगडताना दिसत आहे. अशातच एक बातमी समोर आली आहे. चित्रपट इतिहासात प्रथमच किंग खानच्या ‘डंकी’साठी सर्वात पहिला अगदी पहाटेचा शो मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. मुंबईच्या ‘गेटी-गॅलक्सि’ या जुन्या आणि प्रसिद्ध चित्रपटगृहात ‘डंकी’चा पहिला शो सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होणार आहे. ‘पठाण’, ‘जवान’नंतर आता ‘डंकी’साठी एवढ्या सकाळी लवकरचा शो आयोजित करण्याचा विक्रम या चित्रपटगृहाने रचला आहे.
शाहरुख खानच्या या एका फॅनपेजने ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या फॅनक्लबनेच हा शो आयोजित केला असल्याचं सांगितलं जात आहे. प्रेक्षक शाहरुखच्या या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत अन् हा चित्रपटही त्याच्या इतर दोन चित्रपटांप्रमाणे बॉक्स ऑफिसवर इतिहास रचणारा ठरेल असा विश्वास प्रेक्षकांना आहे. ‘डंकी’ २१ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. याबरोबरीनेच प्रभासचा ‘सालार’सुद्धा प्रदर्शित होणार आहे त्यामुळे बॉक्स ऑफिसवर एक जबरदस्त टक्कर अनुभवायला मिळणार आहे.