‘पठाण’ला मिळालेल्या तुफान प्रतिसदानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. त्याच्या येणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे चित्रपट आहेत. यापैकी शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटातील फर्स्ट लूकची प्रेक्षकांनी प्रशंसा केली. ‘जवान’ हा चित्रपट शाहरुख खानचा या वर्षातील दुसरा बिग बजेट चित्रपट आहे. साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एटली या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.
नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असल्याचं स्पष्ट झालं आहे. मध्यंतरी ‘जवान’च्या सेटवरील बरेच फोटो लीक होत असल्याचं आपण पाहिलं आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला झालेला उशीर आणि कोविडदरम्यान झालेले बदल यामुळे ‘जवान’ ठरलेल्या तारखेला प्रदर्शित होणार नाही अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. पण नुकतंच ‘जवान’च्या रिलीज डेटबद्दल नवीन माहिती समोर आलेली आहे.
‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार ‘जवान’ ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. खात्रीशीर सुत्रांच्या म्हणण्यानुसार, “जवान हा २ जूनला प्रदर्शित होणार हे नक्की आहे. दिग्दर्शक अॅटली आणि रेड चिलीज कंपनीची टीम हे यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत.” इतकंच नव्हे तर या चित्रपटाचं प्रमोशनही लवकरच सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘जवान’चा नवीन टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो अशी चर्चा आहे. या टीझरमधून या चित्रपटाबद्दल आणखी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं म्हंटलं जात आहे. ‘जवान’मध्ये शाहरुख खानसह नयनतारा, विजय सेतुपती, सुनील ग्रोव्हर, सान्या मल्होत्रा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच दीपिका पदूकोण आणि अल्लू अर्जुन यांचा कॅमिओदेखील यात बघायला मिळणार असल्याची शक्यता आहे.