शाहरुख खानचा ‘जवान’ हा बहुचर्चित चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट अनेक रेकॉर्ड मोडत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरातून १ हजारहून अधिक कोटींची कमाई केली आहे. तर आता पुन्हा या चित्रपटाकडे प्रेक्षकांना खेचण्यासाठी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक खास ऑफर आणली आहे.
आणखी वाचा : Jawan OTT release: किंग खानचा ‘जवान’ कधीपासून घरबसल्या पाहता येणार? घ्या जाणून
हा चित्रपट पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते खूप गर्दी करत आहेत. या चित्रपटातील ॲक्शन, कलाकारांची कामं, गाणी, कथा, संवाद या सर्वांनाच खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कमाईचा १०० कोटींचा आकडा पार केला होता. तर आतापर्यंत या चित्रपटाने जगभरातून रेकॉर्डब्रेक अशी १ हजारहून अधिक कोटींची कमाई केली आहे. हाच आकडा आणखी वाढवण्यासाठी निर्मात्यांनी प्रेक्षकांना खास भेट दिली आहे.
रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या पेजवरून शेअर केल्या गेलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये आजपासून जर कोणी ‘जवान’चं एक तिकीट खरेदी केलं तर त्यावर आणखी एक तिकीट मोफत देण्यात येणार आहे. पण जर प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन तिकीट काढलं तर ही ऑफर लागू होणार नाही. फक्त ऑनलाईन बुकिंगवर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारच्या शोजना प्रेक्षकांना एकावर एक तिकीट फ्री मिळेल.