बॉलीवूडचा किंग खान हा लाखो करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. त्याच्या चित्रपटांशिवाय खऱ्या आयुष्यात शाहरुख खानचे इतरांबरोबरचे वागणेदेखील लक्ष वेधून घेणारे असते. आपल्या छोट्या छोट्या गोष्टींनी किंग खान प्रेक्षकांचे मन जिंकून घेत असतो. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाहसोहळ्याला देश-विदेशांतून अनेक पाहुण्यांनी हजेरी लावली होती. बॉलीवूडचे अनेक दिग्गज कलाकारदेखील या बहुचर्चित लग्नसोहळ्यात लक्ष वेधून घेताना दिसले. मात्र, एक क्षण असा पाहायला मिळाल्या; ज्यामुळे चाहत्यांनी शाहरुखचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रजनीकांत, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन व शाहरुख खान एकाच फ्रेममध्ये असल्याचे पाहायला मिळाले आहे. शाहरुख खानने थलाइवा रजनीकांत आणि त्यांची पत्नी, आदित्य ठाकरे, सचिन तेंडुलकर यांना पाहताच पुढे जाऊन, त्यांच्या हातात हात देत त्यांची आदराने भेट घेतली. त्याच वेळी अमिताभ बच्चन आल्याचे दिसताच शाहरुखने खाली वाकून बिग बी आणि जया बच्चन यांच्या पाया पडून, त्यांचे आशीर्वाद घेतल्याचे या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले नेटकरी?
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी शाहरुखचे कौतुक केले आहे. ज्या पद्धतीने शाहरुख खानने बिग बी आणि जया बच्चन यांचे आशीर्वाद घेतले, ते पाहून कभी खुशी कभी गम या चित्रपटाची आठवण आल्याचे एका युजरने म्हटले आहे. “फक्त शाहरुख खानच जया बच्चन यांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो”, असे दुसऱ्या एका नेटकऱ्याने कमेंट करीत म्हटले आहे. शाहरुख खान चांगला माणूस असल्याचे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने “एकच हृदय आहे किती वेळा जिंकणार” असे म्हणत शाहरुखचे कौतुक केले आहे.
अनंत-राधिकाच्या विवाहसोहळ्यात सिनेतारकांनी वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करीत आनंद लुटल्याचे पाहायला मिळाले. आणखी एका व्हिडीओमध्ये शाहरुख बॉलीवूडच्या भाईजानबरोबर डान्स करताना दिसत आहे. त्यांच्याबरोबर अर्जुन कपूर, कतरिना कैफ, विकी कौशल, नीता अंबानी, ईशा अंबानी हेदेखील डान्स करताना दिसत आहेत.
अनंत-राधिकाच्या लग्नात शाहरुख खान जया व अमिताभ बच्चन यांच्या पाया पडला. तर रजनीकांत व सचिन यांना हात जोडून नमस्कार केला.https://t.co/2jrmCKvB4K #AnantAmbani #AnantwedsRadhika #AnantAmbaniRadhikaMerchant #AnantAmbaniRadhikaMerchantWedding #ShahrukhKhan pic.twitter.com/dqP0IDryIK
— LoksattaLive (@LoksattaLive) July 13, 2024
दरम्यान, अनंत-राधिकाच्या शाही विवाहसोहळ्याला अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. हा विवाहसोहळा काल शुक्रवारी (१२ जुलै) पार पडला. सोहळ्यादरम्यान त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांनी लक्ष वेधून घेतले होते. त्याबरोबरच बॉलीवूडचे लाडके कलाकार हे लग्नाच्या थीमप्रमाणे कपडे परिधान करून गेले होते. यादरम्यान, चोली के पीछे क्या है या गाण्यावर माधुरी दीक्षितने केलेल्या डान्सचीदेखील मोठी चर्चा होताना दिसत आहे.