बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्षं फारच उत्तम होतं. ‘पठाण’ व ‘जवान’सारखे १००० कोटींहून अधिक कमाई करणारे चित्रपट शाहरुखने दिले. २०२३ हे वर्षं शाहरुख खानचं आहे असं म्हंटलं तरी टी अतिशयोक्ति होणार नाही. नुकतंच किंग खानच्या वाढदिवसानिमित्त त्याने त्याच्या चाहत्यांना एक सरप्राइज दिलं. काल म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी शाहरुखने त्याचा आगामी चित्रपट ‘डंकी’चा पहिला टीझर प्रदर्शित केला.
सोशल मीडियावर या टीझरला उत्तम प्रतिसाद मिळाला असून चाहते शाहरुखच्या या नव्या चित्रपटासाठी फार उत्सुक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. यानिमित्ताने शाहरुख व राजकुमार हिरानी प्रथमच एकत्र काम करणार आहेत. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासूनच याच्या कथेबद्दल वेगवेगळ्या गोष्टी कानावर पडल्या होत्या. हा चित्रपट भारतातून अवैध पद्धतीने स्थलांतरित झालेल्या लोकांवर भाष्य करणार असल्याचं टीझरवरुन स्पष्ट होत आहे.
टीझरमध्ये ४ मित्र आणि त्यांचं लंडनमध्ये स्थायिक व्हायचं स्वप्न आणि त्यासाठी त्यांची धडपड अशा बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. या चित्रपटाचं कनेक्शन खऱ्याखुऱ्या ‘डाँकी फ्लाईट्स’शी सुद्धा आहे. तर हे प्रकरण नेमकं आहे तरी काय आणि बेकायदेशीर मार्गाने स्थलांतर नेमकं कसं होतं? या ‘डाँकी फ्लाईट्स’चा इतिहास काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायचा हा प्रयत्न आहे.
काय आहे ‘डाँकी फ्लाईट्स’ किंवा ‘डाँकी रुट्स’?
‘डाँकी रुट्स’ ही एक बेकायदेशीर पद्धत आहे ज्यामध्ये प्रथम बाहेरील देशात पोहोचण्यासाठी फक्त वैध व्हिसा आवश्यक आहे, त्यानंतर कोणत्याही कागदपत्रांशिवाय लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचवले जाते. लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात नेणाऱ्या लोकांचे जाळे संपूर्ण देशभरात पसरले आहे. लाखो रुपये घेऊन लोकांना कागदपत्रांशिवाय अमेरिका, कॅनडा किंवा ब्रिटनसारख्या देशात याच ‘डाँकी रुट्स’नी नेले जाते. आर्थिक सुबत्ता आणि एकूणच उत्तम जीवनशैली यासाठी बरेच लोक या मार्गाचा वापर करताना आढळून आले आहेत. कधी फ्लाईटच्या माध्यमातून तर काही सागरी मार्गातून एका कंटेनर मध्ये बसवून तर कधी दोन देशांच्या सीमा पार करत तुम्हाला अवैध पद्धतीने परदेशात नेले जाते.
‘डाँकी रुट्स’ची नेमकी कार्यप्रणाली काय?
पाहायला गेलं तर अशा अवैध पद्धतीने लोकांना परदेशी घेऊन जाणाऱ्या ट्रॅवल एजंटचे जाळे संपूर्ण देशात पसरले आहे. आधी हा प्रकार जास्तकरून पंजाब व उत्तरेकडील राज्यात आढळून यायचा, पण आता हळूहळू हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशसारख्या राज्यातसुद्धा हा प्रकार बेमालुमपणे सुरू असल्याचं जाणवत आहे.
आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘डंकी’चा टीझर पाहून चाहत्यांना आठवला त्याचा सुपरफ्लॉप ‘झीरो’; चित्रपट रचणार वेगळाच इतिहास
जर एखाद्या व्यक्तीला अमेरिकेला ‘डाँकी रुट्स’नी जायचे असेल तर त्यासाठी ट्रॅव्हल एजंट कोणती पद्धत अवलंबतात त्याबद्दल आपण जाणून घेऊया. गाढव ज्यापद्धतीने त्याला इच्छित स्थळी पोहोचण्याआधी इतरत्र सर्वत्र उड्या मारत असते त्याप्रमाणेच थेट अमेरिकेला नेण्याऐवजी हे एजंट त्या व्यक्तीला फिरवून अमेरिकेत नेतात. ट्रॅव्हल एजंट अंदाजे ४० ते ५० लाख रुपये यासाठी घेतात असं सांगितलं जातं. या पैशातून ते समोरच्या व्यक्तीला पासपोर्ट आणि व्हिसासह भारतातून दुबईला नेतात, त्यानंतर अमेरिकेत जाण्यासाठी वेगवेगळ्या देशातून आलेल्या लोकांना एकत्र आणले जाते. मग दुबईहून अजरबैजान अन् तुर्कीमार्गे पनामा व मेक्सिको असा थरारक प्रवास करत या लोकांना मेक्सिकोच्या सीमेवरुन अमेरिकेत नेले जाते. या संपूर्ण प्रवासासाठी तब्बल ३ ते ४ महीने लागतात.
हा एकूणच प्रवास फार भयानक आणि जीवावर बेतेल असाच असतो त्यामुळे या मार्गाने प्रवास केलेल्या लोकांना जीवावर उदार होऊनच या मार्गाचा स्वीकार करावा लागतो. ऊन, पाऊस, थंडी, मोठमोठे डोंगर, जंगल तसेच हिंस्त्र जनावरं तसेच काही ठिकाणी आतंकवाद्यांचे कॅम्प या सगळ्या अग्निदिव्यातून तुम्हाला जावं लागतं. इथे वाचायला सोप्पं वाटत असलं तरी हा मार्ग फार कठीण आहे हे या मार्गाने गेलेल्या बऱ्याच लोकांनी कबूल केले आहे.
‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या रीपोर्टनुसार गेल्यावर्षीच्या ऑक्टोबरपासून यावर्षीच्या सप्टेंबरपर्यंत जवळपास ४२००० भारतीयांनी अवैध मार्गाने अमेरिकेत प्रवेश केला आहे. हीच परिस्थिती ब्रिटनमध्येही पाहायला मिळत आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान तब्बल ६७५ भारतीयांनी अवैध मार्गाने बोटीतून प्रवास करत ब्रिटनमध्ये प्रवेश मिळवला. चांगली जीवनशैली, डॉलर किंवा पाउंडमध्ये कमाई अशी स्वप्न उराशी बाळगून ‘डाँकी रुट्स’नी परदेशात येणाऱ्या या लोकांवर त्या देशातील सरकार कारवाई करतच असते, परंतु अवैध पद्धतीने स्थलांतर करणाऱ्या या लोकांचे आकडे चिंताजनक आहेत.
शाहरुख खानचा चित्रपट याच विषयावर प्रकाश टाकणारा असेल असं टीझरवरुन तरी स्पष्ट होत आहे. यामध्ये आणखी नेमकं काय पाहायला मिळणार? या डाँकी रुट्सचं भयानक वास्तव हा चित्रपट प्रेक्षकांसमोर मांडणार का? याची उत्तरं आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच मिळतील.