Dunki Trailer: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने ‘जवान’ व ‘पठाण’ या दोन्ही चित्रपटांतून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हे वर्षं शाहरुखसाठी फार खास आहे कारण या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांपाठोपाठ किंग खानचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खान व राजकुमार हिरानी यांचा ‘डंकी’ या चित्रपटाची गेले काही दिवस चांगलीच चर्चा आहे. चित्रपटातील दोन गाणी अन् एक छोटा टीझर आल्यापासूनच प्रेक्षक याच्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघत होते. आता मात्र प्रतीक्षा संपली आहे.
नुकताच शाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. शाहरुखचे चाहते व चित्रपटप्रेमी या ट्रेलरची आतुरतेने वाट बघत होते. तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये राजकुमार हिरानी यांच्या नेहमीच्या चित्रपटांप्रमाणेच कॉमेडी आणि इमोशनची जबरदस्त फोडणी पाहायला मिळत आहे. ही गोष्ट पंजाब प्रांतातील लाल्टू गावातील हार्डी अन् त्याच्या चार मित्रांची ज्यांना पंजाब सोडून लंडनमध्ये जायचं आहे. बल्ली, बग्गू, सुखी, मन्नू आणि हार्डी यांच्या मैत्रीची ही गोष्ट राजकुमार हिरानी या ‘डंकी’च्या माध्यमातून सादर केली असल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होत आहे.
आणखी वाचा : रणबीरचा ‘अॅनिमल’ मंडे टेस्टमध्येही पास; चौथ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी, लवकरच पार करणार ३०० कोटींचा टप्पा
या पाचही मित्रांचं लंडनला जायचं स्वप्न, त्यासाठी त्यांनी वापरलेला अवैध मार्ग अन् यामध्ये त्यांच्यासमोर उभी ठाकणारी संकट यांचीदेखील झलक राजकुमार हिरानी यांनी या ट्रेलरमध्ये दाखवली आहे. एकूणच हा चित्रपट राजकुमार हिरानी यांच्या खास पठडीतील असणार हे ट्रेलरमधील डायलॉगवरुन स्पष्ट होत आहे. केवळ इंग्रजी येत नसल्याने लंडनचा व्हिजा नाकरणाऱ्या इंग्रजांनी जेव्हा १०० वर्षं भारतावर राज्य केलं तेव्हा त्यांना हिंदी येत होतं का? असा प्रश्नदेखील ट्रेलरमध्ये शाहरुखचं पात्र विचारताना दिसत आहे.
एकूणच पाच मित्रांची उत्तम जीवनशैलीसाठी लंडनला जायची तीव्र इच्छाशक्ति अन् त्यासाठी त्यांनी अवलंबलेला अवैध मार्ग हा एकूण प्रवासच या चित्रपटातून उलगडणार असल्याचं या ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे. यामध्येदेखील शाहरुखचा एक तरुण अवतार आणि एक वयस्क अवतार आपल्याला पाहायला मिळत आहे. याबरोबरच ट्रेलरमध्ये शाहरुखसह विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन इराणी यांच्याही मजेशीर भूमिका पाहायला मिळत आहेत. नेहमीप्रमाणेच विनोदी शैलीत गंभीर मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या राजकुमार हिरानी यांनी ‘डंकी’च्या बाबतीतही हाच हातखंडा वापरला असल्याचं स्पष्ट होत आहे.
ट्रेलरवर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येत असून लोकांना ट्रेलर चांगलाच पसंत पडला आहे. ‘डंकी’च्या बरोबरीनेच प्रभासचा ‘सालार’देखील प्रदर्शित होणार असल्याने ‘डंकी’चे निर्माते प्रदर्शनाची तारीख पुढे नेणार असल्याची चर्चा होती, परंतु त्यावरही राजकुमार हिरानी यांनी पूर्णविराम दिला आहे. किंग खानचा ‘डंकी’ २१ डिसेंबर २०२३ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे तर प्रभासचा ‘सालार’ हा २२ डिसेंबर २०२३ या दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पुन्हा या वर्षअखेरीस बॉक्स ऑफिसवर एक साऊथ विरुद्ध बॉलिवूड हा मुकाबला पाहायला मिळणार आहे.