शनिवारी शाहरुख खान शारजाहवरून परत येत असताना त्याला कस्टम अधिकाऱ्यांनी रोखले आणि त्याची चौकशी केली. याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. कस्टम ड्युटी न भरल्याने ही चौकशी करण्यात आली आहे असं सांगण्यात येत होतं. एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) च्या सूत्रांनुसार त्याच्याकडे महागडया घडाळ्यांची कव्हर्स होती ज्याची किंमत जवळपास १८ लाख आहे, ज्याचे कस्टम शुल्क आहे ६. ८३ लाख. शाहरुख खान ४१ व्या शारजाह इंटरनॅशनल बुक फेअर या कार्यक्रमातून परतत होता तेव्हा हे सगळं घडल्याची चर्चा कालपासून होत होती. पण आता काही वेगळ्याच गोष्टी समोर आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुखने कोणत्याही प्रकारचा दंड भरलेला नसून त्याने कायदेशीर पद्धतीने कर दिल्याचं सांगितलं जात आहे. इटाईम्सच्या वृत्तानुसार शाहरुख आणि त्याच्या टीमने ज्या वस्तु त्यांच्याबरोबर बाळगल्या होत्या त्यावर कर भरला आहे. त्यांनी कोणताही कर चुकवलेला नसून कोणताही दंड त्यांच्या आकारला नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. सोशल मीडियावर आलेल्या गोष्टींमध्ये आणि खऱ्या घटनेत बरीच तफावत आहे असं सांगण्यात आलं आहे.

आणखी वाचा : “अरे मूर्खांनो…” कामाची पद्धत आणि व्यक्तशीरपणावरून टोमणे मारणाऱ्यांवर अक्षय कुमार वैतागला

शाहरुखच्या बॉडीगार्ड रवि सिंगच्या सांगण्यानुसार, “विमानतळावर कोणतीही फी भरायची असेल तर त्यासाठी जीए टर्मिनल म्हणजेच जनरल एविएशन टर्मिनलवरून टी२ विमानतळावर यावं लागतं. त्यामुळे बऱ्याच लोकांचा गोंधळ उडला असू शकतो.” शिवाय शाहरुखच्या टीमनेही याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. शाहरुखकडे महागडी घड्याळं आणि त्यांचं कव्हर नसून एक अॅपल वॉच आणि त्याचं कव्हर असल्याचं स्पष्ट झालं. शारजाह मध्ये शाहरुखला भेटवस्तू मिळाल्या त्यांची किंमत १७.८६ लाख असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. यावर योग्य तो कर भरूनच शाहरुख बाहेर पडल्याचंही स्पष्ट झालं आहे.

शारजाह मध्ये शाहरुखला त्याच्या चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी सन्मानित करण्यात आलं. शाहरुखचा ‘पठाण’ प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. याबरोबरच त्याचे ‘जवान’, ‘डंकी’ हे चित्रपटही पाठोपाठ येणार आहेत. तब्बल ३ वर्षांनी शाहरुख मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan was not stopped by custom officers he paid actual duties clarifies his team avn