तब्बल ४ वर्षांनी शाहरुख खानने ‘पठाण’ या चित्रपटामधून दमदार कमबॅक केलं आहे. या चित्रपटाने बॉलिवूडवर आलेलं सावट दूर केलं. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत एक दोन नव्हे तर तब्बल २० वेगवेगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडीत काढले आहेत. गेल्यावर्षी आमिर खान, अक्षय कुमारसारख्या सुपरस्टार्सना जे जमलेलं नव्हतं ते शाहरुखने करून दाखवलं आहे.
केवळ २ गाणी, एक ट्रेलर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी थेट संवाद याच्या जोरावरच या चित्रपटाने ही मजल मारली आहे. शिवाय या चित्रपटाच्या टीमने कोणत्याही मीडिया हाऊसला मुलाखती दिल्या नव्हत्या. पण नुकतंच शाहरुख खान, दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम तसेच दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ‘पठाण’च्या घवघवीत यशानिमित्त मीडियाशी संवाद साधला आहे.
आणखी वाचा : “तो माझ्या चेहऱ्यावर आणि गुप्तांगावर…” ‘गंदी बात’फेम अभिनेत्री फ्लोरा सैनीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
या मुलाखतीमध्ये ‘पठाण’च्या टीमने पत्रकारांशी प्रथमच एकत्र संवाद साधला आहे. ४ वर्षांनी शाहरुख खान या चित्रपटातून कमबॅक करत आहे. या ४ वर्षात शाहरुखने नेमका काय विचार केला याविषयी खुद्द शाहरुखनेच स्पष्टीकरण दिलं. “पठाणच्या आधीचा माझा चित्रपट फ्लॉप ठरला. त्यामुळे मी माझ्या प्लॅन बीनुसार जेवण बनवायला शिकायला सुरुवात केली. मी इटालियन जेवण बनवायला शिकलो. लोक म्हणायचे माझे चित्रपट आता चालणार नाहीत, त्यामुळे पठाण फ्लॉप झाला असता तर मी स्वतःचं एक रेस्टॉरंट उघडायचा विचारही केला होता, पण आता ‘पठाण’ या यशामुळे या ४ वर्षातील गोष्टी मी विसरलो आहे.”
आपल्या या प्रवासाबद्दल बोलताना शाहरुखने दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद, यश राज फिल्म्स, जॉन अब्राहम आणि दीपिका पदूकोण यांचे आभार मानले आहेत. ‘पठाण’ने जगभरात ४०० कोटीहून अधिक कमाई केली आहे तर भारतात या चित्रपटाने २०० कोटीचा आकडा पार केला आहे. प्रेक्षक तसेच सेलिब्रिटी मंडळी यांनी हा चित्रपट चांगलाच उचलून धरला आहे.