बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. चित्रपटाने दमदार कमाई केली होती. २००६ साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘डॉन’ चित्रपटही चांगलाच गाजला होता. आत्तापर्यंत डॉनचे दोन भाग आले आहेत. प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. दरम्यान, ‘डॉन-३’ चित्रपटाबाबत मोठी नुकतीच समोर आली. चित्रपटाचे निर्माते रितेश सिधवानी यांनी याबाबतची माहिती दिली.
रितेश यांनी नुकतंच फरहान अख्तर ‘डॉन ३’ची स्क्रिप्ट पूर्ण करण्यात व्यस्त असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर सगळेच या चित्रपटाच्या पुढील अपडेटसाठी उत्सुक झाले, आता मात्र शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली ती म्हणजे या ‘डॉन ३’मध्ये शाहरुख खान दिसणार नसल्याचं म्हंटलं जात आहे.
आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘अवतार २’ लवकरच ओटीटीवर; वाचा कधी अन् कुठे मिळणार पाहायला?
‘पिंकव्हीला’च्या एका वृत्तानुसार शाहरुख खानने ‘डॉन ३’मध्ये काम करण्यास साफ नकार दिला आहे. शाहरुख खान सध्या कमर्शियल चित्रपट करण्यास जास्त उत्सुक आहे जो जगभरातील प्रेक्षक बघणं पसंत करतील आणि ‘डॉन ३’ या साच्यात न बसणारा चित्रपट असल्याने शाहरुखने स्वतःला या चित्रपटातून बाहेरच ठेवायचा निर्णय घेतला आहे.
फरहान अख्तरने ‘डॉन ३’साठी एक भन्नाट संकल्पना तयार केली होती. या चित्रपटात ३ पिढ्यांचे डॉन पाहायला मिळणार होते, म्हणजेच यात अमिताभ बच्चन, शाहरुख खानसह सध्याच्या तरुण अभिनेत्यांपैकी एखादा अभिनेता सादर करायचा फरहानचा प्लॅन होता, पण आता शाहरुखने या प्रोजेक्टपासून स्वतःला वेगळं केल्याने सध्या फरहान अख्तर या चित्रपटाच्या कथेवर पुन्हा काम करत आहे.
याचाच अर्थ ‘डॉन ३’मध्ये शाहरुख खान ऐवजी एक नवा अभिनेता दिसणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या तरी फरहान त्याच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटावर काम करत आहे. ते झाल्यावरच तो ‘डॉन ३’च्या कथेचा पुन्हा वेगळ्या दृष्टीने विचार करेल आणि याचसाठी वेळ लागणार असल्याचं रितेशनेही स्पष्ट केलं. तर शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘जवान’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.