गोविंदा(Govinda) यांनी ९० च्या दशकात अनेक लोकप्रिय चित्रपटांत काम केले आहे. सुमारे १० चित्रपटांत ते एकाच वेळी काम करत असत. त्यामुळे एका दिवसात त्यांच्या वेगवेगळ्या शिफ्ट्स असत. निर्मात्यांना ते वाट पाहायला लावायचे. गोविंदा हे त्यांच्या चित्रपटांसाठी जितके प्रसिद्ध होते, तितकेच ते चित्रपटाच्या सेटवर उशिरा येण्यासाठीही ओळखले जायचे. मात्र, त्यांची लोकप्रियता इतकी होती की, सर्व जण त्यांच्या उशिरा येण्याकडे दुर्लक्ष करीत. त्यांची डान्सची स्टाईल, विनोद करण्याची शैली, टायमिंग व अभिनय यांमुळे त्या काळातील ते लोकप्रिय अभिनेते ठरले होते. गोविंदा यांच्या अभिनयाचे कलाकारसुद्धा चाहते होते. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शक्ती कपूर यांनी गोविंदाचा अभिनय पाहण्यासाठी आमिर खान एकदा लोकांच्या गर्दीत येऊन उभा राहिला होता, अशी आठवण सांगितली आहे. याबरोबरच, इतक्या वर्षांत गोविंदा यांनी त्यांच्यातील कोणती गोष्ट बदलली आहे, याबद्दलही वक्तव्य केले आहे.
कोणत्याही कलाकारासाठी…
शक्ती कपूर यांनी नुकतीच ‘बॉलीवूड बबल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच गोविंदा यांच्याबरोबर शूटिंग करण्याचा अनुभव सांगितला. हा अनुभव सांगताना शक्ती कपूर यांनी म्हटले, “हैदराबादमध्ये आम्ही कव्वालीचा सीन स्टेजवर शूट करत होतो. आमच्यात जुगलबंदी होती. मला दुरून कोणीतरी गर्दीत उभे असलेले दिसले. जेव्हा मी त्याच्याकडे पाहिले, तर मला त्याला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटले. काही वेळानंतर मला याची जाणीव झाली की, तो आमिर खान आहे. मी विचारले की, सर, तुम्ही इथे काय करताय? आणि कोणाला तरी त्यांच्यासाठी खुर्ची व चहा आणायला सांगितला. मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना आमिर खानने म्हटले, “गोविंदा लिप सिंक इतक्या उत्तम प्रकारे कसा करतो आणि मोठा शॉट तो एका टेकमध्ये कसा पूर्ण करतो, हे पाहण्यासाठी मी इथे आलो आहे. मी गोविंदाचा मोठा चाहता आहे, असेही आमिर खानने त्यावेळी म्हटले होते”, अशी आठवण शक्ती कपूर यांनी सांगितली.
इतक्या वर्षांमध्ये गोविंदा यांच्यामध्ये काय बदल झाला आहे, असा प्रश्न विचारला असता, शक्ती कपूर यांनी म्हटले, “इतक्या वर्षांत गोविंदानं स्वत:मध्ये वक्तशीरपणा आणला आहे. एक काळ होता की, जेव्हा गोविंदा सकाळच्या ९ च्या शिफ्टसाठी रात्री ९ ला यायचा. आता सकाळच्या ९ च्या शिफ्टला ८.३० ला पोहोचतो. असुरक्षितता माणसाला कुठून कुठे पोहोचवते. व्यक्तीला बदलते. आता तो खूप प्रोफेशनल आहे आणि हे संपूर्ण इंडस्ट्रीला माहीत आहे.”
गोविंदाच्या बॉलीवूडमधील पुनरागमनाविषयी बोलताना शक्ती कपूर यांनी म्हटले, “अभिनेत्याला पुनरागमन करण्यासाठी खूप उशीर झाला आहे, असे लोक म्हणतात. आपण अमरीश पुरीसारख्या कलाकारांना पाहिले आहे, ज्यांनी वयाच्या ४४ व्या वर्षी सुरुवात केली होती. कोणत्याही कलाकारासाठी कधीच खूप उशीर झालेला नसतो.”
आमिर खानने अनेकदा गोविंदा यांचे कौतुक केल्याचे पाहायला मिळते. २०१० मध्ये पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने गोविंदा यांचे कौतुक करताना म्हटले होते, “माझा आवडता अभिनेता गोविंदा आहे. तो खरंच मला हसवतो. मला त्याचे चित्रपट खूप आवडतात. गोविंदा असा अभिनेता आहे की, जो माझे खरेच मनोरंजन करतो. त्याचा विनोदाचा वेळ खूप चांगला आहे. त्याचा सँडविच हा चित्रपट मी १०-१२ वेळा पाहिला आहे.
दरम्यान, ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’मध्ये गोविंदा यांनी बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार असल्याचे म्हटले आहे. आता ते कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.