Shraddha Kapoor Buys luxury apartment : ‘स्त्री २’ ब्लॉकबस्टर झाल्यानंतर आता श्रद्धा कपूरने रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. श्रद्धाने मुंबईत आलिशान अपार्टमेंट विकत घेतले आहे. तिने तिचे वडील अभिनेते शक्ती कपूर यांच्याबरोबर मिळून हे अपार्टमेंट घेतलं. मागील आठवड्यात या मालमत्तेची नोंदणी करण्यात आली.
झॅपकीवर उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार श्रद्धा कपूरने तिचे वडील शक्ती कपूर यांच्याबरोबर मुंबईत एक आलिशान अपार्टमेंट विकत घेतले आहे. या अपार्टमेंटची किंमत तब्बल ६.२४ कोटी रुपये आहे. हे अपार्टमेंट प्रतिष्ठित पिरामल महालक्ष्मी साऊथ टॉवरमध्ये आहे. या मालमत्तेची नोंदणी १३ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आली.
या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया १०४२.७३ चौरस फूट आहे, ज्यामध्ये दोन बाल्कनीदेखील आहेत. या अपार्टमेंटचा प्रति चौरस फूट दर ५९,८७५ रुपये आहे. हे अपार्टमेंट ग्लायडर बिल्डकॉन रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडने विकले आहे. पिरामल महालक्ष्मी साउथ टॉवरमध्ये टू आणि थ्री बेडरूमचे अपार्टमेंट आहेत.
श्रद्धाने भाड्याने घेतले अपार्टमेंट्स
दरम्यान, श्रद्धा ‘स्त्री 2’ च्या यशामुळे खूप चर्चेत आहे. तिने २०२४ मध्ये जुहू येथे ६ लाख रुपये दरमहा भाड्याने एक आलिशान अपार्टमेंट घेतले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तिने एक अपार्टमेंट भाड्याने घेतलं होतं. त्यासाठी तिने एका वर्षाचं भाडं ७२ लाख रुपये अॅडव्हान्समध्ये दिलं होतं.
दरम्यान, २०२४ हे वर्ष श्रद्धासाठी खूप चांगलं राहिलं. ‘स्त्री 2:’ने बॉक्स ऑफिस गाजवलं. मागच्या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या मोजक्याच हिंदी चित्रपटांपैकी एक हा चित्रपट होता. यामध्ये राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी, तमन्ना भाटिया यांच्यादेखील भूमिका होत्या. श्रद्धाच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झाल्यास ती धूम फ्रेंचायझीच्या आगामी सिनेमात दिसणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमासाठी अभिनेता रणबीर कपूरचं नाव चर्चेत आहे. रणबीर व श्रद्धा यांनी यापूर्वी ‘तू झुठी मै मक्कार’मध्ये एकत्र काम केलं होतं. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट हिट झाला होता, त्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती.