गेल्या काही वर्षात अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. यातील बहुतांश चित्रपटांवर प्रेक्षकांसह तज्ज्ञ आक्षेप घेताना दिसत आहेत. मराठमोळे दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट गेल्या दीड महिन्यांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. काहींनी तर टीझर पाहून चित्रपटामधील कलाकारांच्या लूकची खिल्ली उडवली. या चित्रपटाच्या व्हीएफएक्सबाबतही नेटकरी टीका करत आहेत. मात्र या चित्रपटाच्या हिंदी डबिंगसाठी मराठमोळ्या शरद केळकरचा दमदार आवाजाचा वापर करण्यात आला आहे. मात्र आता या आवाजाच्या मागच्या भूमिकेविषयी शरद केळकरने मोठा खुलासा केला आहे.
‘आदिपुरुष’ या चित्रपटात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभासच्या हिंदी भूमिकेसाठी शरद केळकरने आवाज दिला आहे. याबद्दल नुकतंच शरद केळकरने भाष्य केले.
आणखी वाचा : “आपण जे बघतो त्यावर…” मानसी नाईकच्या गंभीर आरोपांवर पतीचे सडेतोड उत्तर
नुकतंच ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत शरद केळकर म्हणाला, “आदिपुरुष या चित्रपटातील प्रभासच्या भूमिकेसाठी तुला आवाज द्यायचा आहे, हे मला ओम राऊत यांनी पहिल्या दिवशी सांगितले होते. मी स्वत:ला खूप भाग्यवान आणि धन्य समजतो की मला प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी आवाज देता आला. मला याचा खूप आनंद आहे.”
“गेली अनेक वर्ष लोक मला बाहुबलीचा आवाज म्हणून ओळखत होते. अनेकांनी तर माझे नाव तसेच लक्षात ठेवले आणि आता २०२३ नंतर मला हेच सर्वजण श्रीरामाचा आवाज म्हणून लक्षात ठेवतील, याचा मला खूप आनंद आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की प्रभू श्रीरामांनी मला त्यांचा आवाज म्हणून निवडले”, अशी भावना त्याने व्यक्त केली.
आणखी वाचा : “मी गायब झालोय असं रोज वाचनात येतं पण…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतने सांगितली सत्य परिस्थिती
दरम्यान शरद केळकरने याआधी एसएस राजामौली यांच्या बाहुबलीमधील प्रभासच्या पात्रासाठी आवाज दिला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आता आदिपुरुषमध्ये देखील शरद केळकरच्या आवाजाची जादू पाहायला मिळणार आहे.