गेल्या काही वर्षात अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट तयार करण्यात आले. त्यातील बहुतांश चित्रपटांवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला. सध्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर प्रेक्षक टीका करत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. बहुतांश प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया देत टीका केल्या. चित्रपट बनवताना दिग्दर्शक घेत असलेल्या लिबर्टीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. आता ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट बनवताना विचारात घेतल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या मुद्यांवर अभिनेता शरद केळकरने भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : जपानमध्ये ‘आरआरआर’चा डंका, प्रभासच्या ‘साहो’ला मागे टाकत रचला नवा विक्रम
शरद केळकरने नुकतीच ‘झी न्यूज’ला मुलाखत दिली. यावेळी त्याला गेली काही वर्ष ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांवरून चालेल्या वादाबद्दल, हे चित्रपट बनवताना दिग्दर्शक घेत असलेल्या लिबर्टीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, “आपण कोणीही जुना काळ पाहिलेला नाही. या सर्व कथा आहेत, कल्पना आहेत. तसेच एखाद्या व्यक्तीने केलेल्या वर्णनावर हा इतिहास लिहिला गेला आहे. त्याला अनेक मार्ग असू शकतात. पण तरीही आपण सर्वजण त्यावर विश्वास विश्वास ठेवतो. चित्रपटाचं माध्यम हे थोडं मनोरंजकही आहे, नाहीतर आपण डॉक्युमेंटरी बनवल्या असत्या.”
चित्रपटांच्या लिबर्टीबद्दल बोलताना शरद केळकर म्हणाला, “लोकांचं मनोरंजन व्हावं यासाठी चित्रपट बनवले जातात आणि ते खरे नसतात. चित्रपट हे कल्पनेवर आधारित असतात, ती स्वप्ने असतात जी तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहता. त्यामुळे चित्रपट हे थोडे मनोरंजक बनवले जातात आणि त्याला तत्थ्यांची जोड असणंही महत्वाचं असतं. चित्रपट मनोरंजक करण्यासाठी त्यांच्या कथेचे थोडे रूपांतरण करावे लागते. परंतु रूपांतरण करताना संपूर्ण इतिहास बदलला गेला तर ते चुकीचे ठरेल. पण काही दिग्दर्शक चित्रपट भाव्य करण्यासाठी, मनोरंजक करण्यासाठी ती लिबर्टी घेतात आणि ते सगळीकडे केलं जातं. मला वाटतं, चित्रपट हा तथ्यांच्या आधारे बनवला गेला पाहिजे आणि तो मनोरंजकही असला पाहिजे. त्यासाठी थोडी लिबर्टी घेतली तर ते चुकीचे ठरणार नाही. पण लिबर्टी घेतल्यावर आपण ज्या व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवत आहोत, त्यांच्या व्यक्तिमत्वाला कुठेही धक्का लागता कामा नये. प्रत्येक गोष्टीचा समतोल नीट साधला गेला पाहिजे.”
हेही वाचा : प्रभासचे हिंदी चित्रपट आपटल्याने निर्मात्यांना पुन्हा आली शरद केळकरची आठवण, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
शरद केळकरने ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास साकारत असलेल्या व्यक्तीरेखेला हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिला आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची कथा रामायणावर बेतलेली आहे. या चित्रपट चित्रपटात सैफ अली खान हा रावणाची भूमिका साकारणार आहे आणि प्रभास श्री रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘सिता’ हे पात्र ती साकारणार आहे.