Sharad Ponkshe Video About Chhava Movie: छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्य गाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे, तर रश्मिका महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘छावा’ या ऐतिहासिक सिनेमाबद्दल अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
शरद पोंक्षे यांनी ‘छावा’ सिनेमा पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचं त्यांनी खूप कौतुक केलं आहे. त्यांनी उत्तम सिनेमा महाराजांवर आणला आहे, असं मत पोंक्षे यांनी व्यक्त केलं. त्यांनी लोकांना हा चित्रपट पाहण्याची हात जोडून विनंती केली आहे. ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर शरद पोंक्षे काय म्हणाले, ते जाणून घेऊयात.
व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे म्हणाले, “मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘छावा’ हा चित्रपट पाहिला. चित्रपट खूपच उत्तम बनवला आहे. प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक हिंदूने हा चित्रपट पाहायला हवा. रक्त खवळतं, डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत.”

पुढे ते म्हणाले, “आपल्या स्वराज्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या शंभूराजेंनी इतक्या वेदना सहन केल्या आणि त्या नालायक औरंगजेबाने क्रूरतेचा कळस गाठला. लक्ष्मण उतेकर यांनी इतक्या सुंदर पद्धतीने हा चित्रपट शूट केला आहे, की त्यांचं कौतुक करायला हवं. विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका खूपच उत्तमरित्या साकारली आहे. या चित्रपटात जेवढे मराठी कलाकार आहेत, सर्वांनी खूप सुंदर पद्धतीने आपापलं काम केलं आहे. खूप वर्षांनी एक खूपच उत्कृष्ट ऐतिहासिक चित्रपट पाहायला मिळाला. या चित्रपटाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एआर रहमान यांचे बॅकग्राउंड म्युझिक खूप छान आहे.”
पाहा व्हिडीओ –
चित्रपटाचा शेवट पाहवत नाही, असं शरद पोंक्षे म्हणाले. “औरंगजेब शेवटी आपले धर्मवीर संभाजी महाराज यांची एवढ्या क्रूरतेने हत्या करतो, ते पाहवत नाही. कुठे असे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशवा यांच्यासारखे महानायक महाराष्ट्रात जन्मले आणि कुठे आजकालचे तरुण. हा चित्रपट पाहावा लागेल, महानायकांकडून शिकावं लागेल. प्रत्येक तरुण, प्रत्येक भारतीय, प्रत्येक हिंदूने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जो ‘छावा’ नावाचा चित्रपट आहे तो पाहायला हवा. मी हात जोडून विनंती करतो, प्लीज आताच तिकीट काढा आणि छावा पाहा,” असं आवाहन शरद पोंक्षे यांनी केलं आहे.