बॉलीवूड अभिनेता शारिब हाश्मीने अनेक चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘तरला’ आणि ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटांमध्ये शारिबने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी शारिबला मोठा संघर्ष करावा लागला. मात्र, अभिनेत्याच्या कठीण काळात त्याला त्याच्या पत्नीने प्रचंड साथ दिली. याबाबत त्याने अलीकडेच दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
शारिब म्हणाला, “आयुष्यातील पहिला प्रोजेक्ट मिळण्यासाठी मी जवळपास ३ वर्ष ऑडिशन्स दिल्या. या काळात माझे कुटुंब आर्थिक संकटातून जात होते. २००३ मध्ये माझे लग्न झाले आणि २००९ मध्ये मी चित्रपटांसृष्टीत काम करण्यासाठी एमटीव्हीमधील इन-हाऊस लेखकाची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. ‘धोबीघाट’ चित्रपटातील भूमिका नाकारण्यात आल्यावर माझ्याकडे कोणतेही काम नव्हते. तरीही मी प्रयत्न सुरु ठेवले होते.”
अभिनेता पुढे म्हणाला, “नोकरी सोडल्यावर मला केवळ सगळ्या ऑडिशन द्यायच्या होत्या. माझ्यावर माझी पत्नी आणि आमच्या मुलाची जबाबदारी होती. एक वेळ अशी आली की, मित्रांकडून कर्ज घ्यावे लागले, बायकोचे दागिने आणि राहते घरही विकले. कुटुंबासाठी जेवणाची व्यवस्था कशी करू? असे असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. या काळात बायकोने मला खंबीरपणे साथ दिली.”
“तीन वर्ष ऑडिशन देण्यात अपयशी ठरल्यावर मी पुन्हा एकदा नोकरी करण्याचा निर्णय घेतला. सोनी टीव्हीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या शोच्या अँकरसाठी मी स्क्रिप्ट लिहून द्यायचो. त्यानंतर मी ‘मेहरूणी’ नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले. शानू शर्माने हा चित्रपट पाहिला आणि मला ‘जब तक है जान’साठी माझी निवड करण्यात आली.” असे शारिबने सांगितले.
हेही वाचा : सुधीर फडके यांच्यावरील चरित्रपटाची घोषणा
दरम्यान, शाहरुखच्या ‘जब तक है जान’ मध्ये पदार्पण केल्यावर पुढे शारिबला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता बॉलीवूडमध्ये अभिनेत्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच ‘झी-फाइव्ह’वर प्रदर्शित झालेल्या हुमा कुरेशीच्या ‘तरला’ चित्रपटामध्ये शारिबने तरला दलालच्या नवऱ्याची भूमिका साकारली होती. तसेच सारा अली खान आणि विकी कौशलच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटातही तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.