अभिनेत्री शर्मिला टागोर(Sharmila Tagore) या त्यांच्या अनेक गाजलेल्या भूमिकांसाठी ओळखल्या जातात. ‘देवी’, ‘अनुपमा’, ‘दिल और मोहब्बत’, ‘दाग’, ‘बेशरम’, अशा अनेक चित्रपटात शर्मिला टागोर यांनी काम केले आहे. याबरोबरच, अनेकदा त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. १९६८ मध्ये जेव्हा त्यांनी प्रसिद्ध क्रिकेटर मन्सूर अली खान यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली, तेव्हा या जोडप्याबद्दल मोठी चर्चा झाली होती. मन्सूर अली खान यांच्या नावाने पतौडी ट्रॉफीदेखील दिली जाते. मन्सूर अली यांना टायगर या नावानेही ओळखले जाते. इग्लंड आणि भारतात दरवर्षी होणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेत जो संघ विजयी होतो, त्याला ही ट्रॉफी दिली जाते. २००७ पासून ही ट्रॉफी देण्यास सुरूवात केली आहे. इबीसी(England and Wales Cricket Board) आणि बीसीसीआय(Board of Control for Cricket in India)ने ही ट्रॉफी निवृत्त करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. मात्र बीसीसीआयच्या या निर्णयाचे दु:ख झाल्याच्या भावना शर्मिला टागोर यांनी व्यक्त केल्या आहेत.

शर्मिला टागोर काय म्हणाल्या?

हिंदुस्तान टाइम्सबरोबर शर्मिला टागोर यांनी नुकताच संवाद साधला. यावेळी बीसीसीआयच्या पतौडी ट्रॉफी निवृत्त करण्याच्या निर्णयावर शर्मिला टागोर म्हणाल्या, “मला त्यांच्याकडून काहीच समजले नाही. परंतु ईसीबीने सैफला पत्र पाठवले आहे की ते ट्रॉफी निवृत्त करत आहेत. बीसीसीआयला टायगरचा वारसा लक्षात ठेवायचा असेल किंला नसेल ते त्यांनीच ठरवायचा आहे”, अशा भावाना शर्मिला टागोर यांनी व्यक्त केल्या. याबरोबरच, बीसीसीआयच्या निर्णयाने त्यांना दु:ख झाल्याचे त्यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना म्हटले. बीसीसीआयने पतौडी ट्रॉफी निवृत्त करण्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केली नाही.

एका जुन्या मुलाखतीत सिमी गरेवालशी बोलताना, शर्मिला टागोर यांना धर्म बदलण्याबद्दल विचारण्यात आले होते. यावर बोलताना शर्मिला टागोर म्हणाल्या होत्या, ” हे खूप सोपे नव्हते आणि खूप कठीणही नव्हते. हे सर्व समजून घ्यावे लागले. याआधी मी फार धार्मिक नव्हते. पण आता मला वाटते की मला हिंदू धर्म आणि इस्लामबद्दल अधिक माहिती आहे.”

दरम्यान, जानेवारी महिन्यात सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला होता. त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी हे कुटुंब मोठ्या चर्चेत आले होते. सैफ अली खानने हल्ल्यानंतर लीलावती रूग्णालयात धाव घेतली होती. या हल्ल्यातून सावरल्यानंतर सैफ अली खानने मुलाखतींमध्ये घटनेदरम्यान नेमके काय घडले होते, याबद्दल खुलासा केला होता. वडिलांवर झालेल्या हल्यानंतर सारा अली खानने म्हटले होते की आपले आयुष्य एका रात्रीत बदलू शकते. त्यामुळे आपल्याला जे आयुष्य मिळाले आहे, त्याबद्दल आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. सारा अली खान, तैमुर, जेह, इब्राहिम ही सैफची चारही मुले सतत चर्चेत असलेली दिसतात.