विविध धाटणीच्या भूमिका साकारत मनोरंजनसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या, अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री म्हणजे शर्मिला टागोर(Sharmila Tagore) होय. कश्मीर की कली, हम तो चलें परदेस, माँ बेटी, सफर, राजा रानी, लाइफ गोज ऑन, ब्रेक के बाद, गुलमोहर अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अनेकदा मुलाखतींमध्ये त्या चित्रपटांचे किस्से सांगतानादेखील दिसतात. शर्मिला टागोर यांनी नुकतीच ‘स्क्रीन लाइव्ह’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात कोणत्या गोष्टींचा सामना केला, याचा खुलासा केला आहे.

काय म्हणाल्या शर्मिला टागोर?

‘स्क्रीन’बरोबर संवाद साधताना शर्मिला टागोर यांनी म्हटले, “जेव्हा मी चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यावेळी चित्रपटात काम करणे हे समाजाच्या नियमांबाहेरचे होते. त्यामुळे त्यावर टीका केली जात असे. त्यामुळे चित्रपटसृष्टीनेदेखील माघार घेतली होती. त्यांचे स्वत:चे छोटे-छोटे क्लब असायचे. ते समाजापासून दूर राहायचे. कारण- त्यांना ‘जज’ केले जायचे. पुरुष कलाकारांना स्वीकारले जायचे; तर महिलांना आदर दिला जात नसे.”

याविषयी अधिक बोलताना त्यांनी म्हटले, “कधी काळी मला वाटले होते की, माझीसुद्धा प्रशंसा केली जाईल. जेव्हा तुमचे लग्न होते, तुम्ही आई होता, त्यावेळी तुम्हाला वेगळ्या प्रकारचा आदर मिळतो. मला आठवते की, मी एकदा हैदराबादला गेले होते. एक गाडी मला घ्यायला येणार होती. काही मिनिटांतच माझ्यासभोवती गर्दी गोळा झाली होती. लोकांनी मला विचारले की, तुमच्या मुलाला कोणत्या गोष्टींची गरज आहे का? ते मला एका खोलीत घेऊन गेले. माझ्यासाठी एक खुर्ची आणली गेली. ते एक वेगळ्याच प्रकारचे स्वागत होते.”

शर्मिला टागोर यांनी पुढे म्हटले, “इतक्या वर्षांत समाजाचा विकास झाला आहे. विशेषत: चित्रपटसृष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. एकदा जमावाने माझ्यावर चिखलफेक केली होती आणि एका वेळेस मी ज्या ट्रेनने प्रवास करणार होते, त्याला आग लावण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, नंतर गोष्टी बदलल्या. मी एका वेगळ्या प्रकारच्या कुटुंबातून येते. जी. एन. टागोर यांची मी मुलगी होते. मला माहीत होते की, मी कोण आहे आणि माझा स्वत:वर विश्वास होता. लोक माझ्याबद्दल काय विचार करत आहेत, याचा मी फारसा विचार करत नव्हते. आता जशी मी आहे, तशीच तेव्हाही होते. मात्र, मी एकटीच हॉटेलमध्ये राहायचे. माझ्यावर लक्ष ठेवायला कोणी नव्हते. त्यामुळे लोक माझ्याबद्दल वेगळ्या कल्पना करायचे. बाकीचे लोक महाराष्ट्रामधील होते. त्यांच्यावर लक्ष ठेवायला कोणीतरी असे. ते पांढर्‍या रंगाचे कपडे परिधान करीत असत. ते दारू प्यायचे नाहीत. मी वेगळी होते आणि त्यामुळे लोकांच्या दृष्टीने मी वाईट मुलगी होते.”

हेही वाचा: “आई वडिलांच्या घटस्फोटामुळे माझ्या अभ्यासावर…”, अर्जुन कपूर झाला व्यक्त; म्हणाला, “मी शिक्षणातून…”

शर्मिला टागोर यांनी म्हटले की, मी प्रत्येकाला विनंती करू शकत नव्हते किंवा प्रत्येकाची मनधरणी करू शकत नव्हते. जोपर्यंत मी माझ्या सदसद्विवेकबुद्धीनुसार वागते, तोपर्यंत मी कठोर टीकेलादेखील सामोरी जाऊ शकते, हे मला स्पष्ट होते. मला माझ्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळाला. कुटुंबानेच प्रशंसाही केली.

दरम्यान, शर्मिला टागोर या २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या गुलमोहर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

Story img Loader