9
‘कश्मीर की कली’ या १९६४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाद्वारे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे शर्मिला टागोर(Sharmila Tagore). ‘वक्त’, ‘अनुपमा’, ‘सावन की घटा’, ‘तलाश’, ‘यकींन’, ‘नायक’, ‘दिल और मोहब्बत’, ते अगदी २०२३ ला प्रदर्शित झालेला ‘गुलमोहर’ हा चित्रपट असो; अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी अनेकविध चित्रपटांतून मनोरंजन केले.
काय म्हणाल्या शर्मिला टागोर?
ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी नुकतीच स्क्रीन लाइव्हमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांतील काही फोटो दाखवीत त्यामागची आठवण सांगितली. ‘कश्मीर की कली’ या चित्रपटाचा त्यांनी फोटो दाखवला. या चित्रपटात शर्मिला टागोर व शम्मी कपूर हे प्रमुख भूमिकांत होते. या चित्रपटाची आठवण सांगताना शर्मिला टागोर यांनी म्हटले, “या चित्रपटात जबरदस्त गाणी होती. डान्स करताना मी थोडीशी घाबरले होते. मात्र, शम्मी कपूर माझ्यापेक्षा २०० पटींनी जास्त चांगले करत होते. मी फक्त त्यांच्याबरोबर डान्स करण्याचा प्रयत्न करीत होते.” याबरोबरच, शम्मी कपूर यांचे ऊर्जा टिकवून ठेवणे ही सोपी गोष्ट नसल्याचेदेखील त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी म्हटले, “ते रिहर्सल करताना काहीतरी वेगळे करायचे आणि जेव्हा प्रत्यक्षात सीन शूट केला जायचा, त्यावेळी ते वेगळेच काहीतरी करत असत. माझ्यासारख्या नवख्या मुलीला अशा परिस्थितीशी जुळवून घेणे थोडेसे अवघड जात होते; मात्र मजा यायची. ते स्वत: स्वत:चा ब्रॅण्ड होते. १९६४ मध्ये त्यांनी ब्रेक डान्ससारखे प्रकार सुरू केले होते. तसेच, उत्स्फूर्तपणे काहीतरी वेगळ्या गोष्टी करणे, असे प्रकार ते करीत असत. हेच अनेक वर्षांनंतर शाहरुख खानसारख्या कलाकारांनी केले.”
काही दिवसांपूर्वी रणबीर व आलियाचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ एआयद्वारे तयार करण्यात आला होता. त्यामध्ये शम्मी कपूर व शर्मिला टागोर यांच्याऐवजी रणबीर व आलिया दिसत होते. त्यावरदेखील शर्मिला टागोर यांनी मत व्यक्त केले. त्यांनी म्हटले, “आजच्या काळातील कलाकार हे बहुआयामी आहेत यामध्ये कोणतीच शंका नाही. ते वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करू शकतात. शम्मीजी अद्वितीय होते. आलिया व रणबीरचा व्हिडीओ मी पाहिला आणि तो शम्मीजींच्या जवळपासही पोहोचू शकत नाही”, असेही अभिनेत्रीने म्हटले आहे.