शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील शाहरुखचा फर्स्ट लूक, टीझरला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. आता नुकतंच या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने चांगली कमाई करायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा- ‘G-20 समिट’चा शाहरुख खानच्या ‘जवान’ला बसणार फटका; दिल्लीतील चित्रपटगृहं राहणार बंद?
परदेशात या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. डीएनएच्या बातमीनुसार, या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगने १. २५ कोटी तिकिटे विकली गेली आहे. या चित्रपटाचे यूएसएमध्ये ३६७ ठिकाणी एकूण १६०७ शो ठेवण्यात आले आहेत. चित्रपटाच्या कमाईबाबत बोलायच झालं तर ॲडव्हान्स बुकिंग पाहता पहिल्याच दिवशी हा चित्रपट मोठी कमाई करु शकतो. काहींच्या मते पहिल्याच दिवशी हा चित्रपट जवळपास १०० कोटीचा व्यवसाय करण्याची शक्यता आहे.
‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखच्या जोडीला साऊथची तगडी स्टारकास्ट असणार आहे. यामध्ये शाहरुखबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. हिंदीबरोबरच हा चित्रपट तमिळ, तेलगु भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.