‘लाइफ इन मेट्रो’, ‘अपना आसमान’, ‘हासिल’, अशा अनेक चित्रपटांतून दिवगंत अभिनेते इरफान खान( Irrfan Khan) यांनी त्यांच्या अभिनयाची छाप उमटवली. अनेक कलाकारांसाठी इरफान खान हे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याबरोबर काम केलेले कलाकार अनेकदा त्यांच्या आठवणी सांगताना दिसतात. आता अभिनेता शशांक अरोराने एका मुलाखतीत इरफान खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
काय म्हणाला अभिनेता?
शशांक अरोराने नुकतीच ‘द लल्लनटॉप’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द साँग ऑफ स्कॉर्पियन्स’ या चित्रपटात इरफान खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. याचबरोबर अभिनेत्याच्या तत्त्वज्ञानात्मक स्वभावाविषयीदेखील त्याने वक्तव्य केले आहे. या मुलाखतीत त्याला विचारले की, इरफान खानबरोबर काम करण्यापूर्वी कधी बोलणे झाले होते. तुमच्यात संवाद झाला होता का? त्यावर बोलताना अभिनेत्याने म्हटले, “कधीच नाही. मी पहिल्यांदा त्यांना सेटवर भेटलो. त्यांनी मला विचारले की, स्क्रिप्ट तुला आठवत आहे का? मी म्हटले की हो, आठवतेय. त्यांनी मला त्यांचे संवाद सादर करायला सांगितले आणि त्यांनी माझे केले. आमची पहिली रिहर्सल अशी होती. त्यानंतर त्यांनी मला सांगितले की, मी हेडफोन लावत आहे, जेव्हा शूटिंग सुरू होईल. तेव्हा मला कळव. आम्ही जेव्हा या चित्रपटाचे शूटिंग करत होतो, त्यावेळी त्यांना बरे वाटत नव्हते. त्यांना वेदना होत होत्या. ते कठीण काळातून जात होते.”
एक किस्सा सांगताना अभिनेत्याने म्हटले, “आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ शूट करीत होतो. तिथे रात्री खूप थंडी असायची आणि इरफान खान यांनी कुर्ता-पायजमा परिधान केला होता. माझ्याकडे त्यांच्या खूप सुंदर आठवणी आहेत. ते खूप दयाळू होते; मात्र त्यावेळी ते खूप वेदना सहन करत होते. मला तो काळ आठवला की, रडायला येते आणि मला आनंदसुद्धा यासाठी होतोय की, मला इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली.”
पुढे बोलताना अभिनेत्याने म्हटले, “आयुष्य इतके सोपे नाही. एक दिवस इरफान खान यांनी मला बाईकवरून बॉर्डरपर्यंत पतंग उडवत जाऊ, असे म्हटले. मी त्यांना विचारले की, कुठपर्यंत जायचं? ते मला म्हणाले, “मला पतंग बॉर्डर क्रॉस करून उडताना बघायचा आहे. बघू या पतंगाला कोण गोळी मारतं?” निर्माते असे करू नको, म्हणत माझ्यामागे पळत होते. त्यांनी कधीच मेकअप किंवा त्यांच्या केसांबद्दल काळजी केली नाही. आपल्या देशात असे खूप कमी कलाकार आहेत, जे या गोष्टींची काळजी करत नाहीत.”
इरफान बनवत असलेल्या गुलकंदच्या हलव्याबद्दल विचारले तेव्हा शशांकने म्हटले, “ती रेसिपी तर ते त्यांच्याबरोबर घेऊन गेले. मी असं काही तरी बनवूच शकत नाही. इरफान खान यांनी जोपर्यंत मला विचारलं नव्हतं तोपर्यंत मी अशा एखाद्या पदार्थाबद्दल ऐकलंच नव्हतं. त्यांनी मला एकदा सेटवर विचारले, “ए शशांक, गुलकंदचा हलवा खाणार का?” मी त्यावर त्यांना हो म्हणालो होतो.”
लोकांपर्यंत चित्रपट पोहोचण्याबद्दलचा त्याचा दृष्टिकोन कसा बदलला याचा एक किस्सा सांगताना शशांकने म्हटले, “आम्ही पोखरणमध्ये होतो. दोन लहान मुलं आमच्याकडे आली आणि म्हणाली, “आम्ही यांना कुठेतरी पाहिलं आहे.” मी म्हटले, “ते लोकप्रिय अभिनेते आहेत. तुम्ही त्यांना लंच बॉक्स किंवा पान सिंह तोमर अशा कोणत्या तरी चित्रपटात पाहिलं असणार.” त्यांनी विचारले की, तू कोण आहेस? मी म्हटले, “मीसुद्धा अभिनेता आहे. डायनोसोरचा चित्रपट पाहिला आहे का?” त्यांच्याशी बोलताना समजले की, त्यांनी जुरासिक वर्ल्ड हा चित्रपट पाहिला होता. जो त्यांच्या गावामध्ये अनेक महिने दाखवला गेला होता. महत्त्वाचे म्हणजे हा चित्रपट हिंदी किंवा इतर कोणत्या प्रादेशिक भाषेत नव्हता”, असे म्हणत अभिनेत्याने इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
दरम्यान, इरफान खान यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे, तर चित्रपटसृष्टीतील ३० वर्षांच्या कारकिर्दीत इरफान खान यांना सहा फिल्मफेअर अवॉर्ड्स, आशियन फिल्म अवॉर्ड्स व राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. चित्रपटसृष्टीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या अभिनेत्याचे २०२० मध्ये वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले.