निर्माते विपुल अमृतलाल शाह यांचा आगामी चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून चित्रपटाबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या युथ लीगने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अशातच काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही चित्रपटाला विरोध केला आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये केरळमधील तब्बल ३२००० महिलांनी कथितपणे इस्लाम धर्म स्वीकारला असून त्यांना दहशतवादी संघटनेने भरती केल्याचे दाखवण्यात आले आहे. चित्रपटाबद्दलचा वाद वाढ असतानाच खासदार शशी थरूर यांनीही त्याबाबत ट्वीट केलंय. त्यांनी चित्रपटाचं नाव द केरळ स्टोरीचं नाव वापरत कॅप्शन दिलंय, तसेच पोस्टरही शेअर केलं आहे. “ही तुमच्या केरळची गोष्ट असू शकते. ही आमची केरळ स्टोरी नाही,” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
केरळ राज्याचे नकारात्मक चित्रण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करत राजकीय पक्षांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. सीपीआय-एम आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगने केरळमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. संघ परिवाराचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी हा चित्रपट बनवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
‘द केरळ स्टोरी’च्या प्रदर्शनावर बंदीची मागणी; निर्माते विपुल शाह म्हणाले, “लव्ह जिहाद वगैरे…”
दरम्यान, या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अदा शर्माने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. “आमचा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. हा चित्रपट दहशतवादविरोधी संघटनेवर नक्कीच भाष्य करीत आहे. मुलींवर अत्याचार, अमली पदार्थांचे सेवन, मुलींचा करण्यात येणारा ब्रेनवॉश, त्यांच्यावर केला जाणारा बलात्कार, मानवी तस्करी आणि जबरदस्तीने गर्भधारणा करणे आणि त्यानंतर वारंवार बलात्कार करणे याविरोधात आहे. मुली ज्या बाळांना जन्म देतात ती त्यांच्यापासून दूर केली जातात आणि नंतर त्यांना आत्मघाती बॉम्बर बनवले जाते. अशा अनेक गंभीर समस्यांवर हा चित्रपट भाष्य करीत आहे,” असं तिने म्हटलंय.