बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये मनीषा कोईराला(Manisha Koirala)चे नाव घेतले जाते. ९० च्या दशकात अनेक चित्रपटात काम करत अभिनेत्रीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक छोटी सी लव्ह स्टोरी’ या चित्रपटामुळे अभिनेत्री मोठ्या चर्चेत आली होती. या शॉर्ट फिल्ममध्ये १४ वर्षीय आदित्य सीलने काम केले होते. या शॉर्ट फिल्ममधील काही दृश्यांवर अभिनेत्रीचा आक्षेप होता. चित्रपटात तिच्या ड्युप्लिकेटबरोबर काही सीनचे शूटिंग झाले होते, त्यावर अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केली होती. ही चित्रपट प्रदर्शित होऊ नये, त्यावर बंदी घालावी यासाठी मनीषाने कोर्टातदेखील धाव घेतली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक के शशिलाल नायर यांनी काही आक्षेपार्ह दृश्यांचा वापर केल्याचा आरोप करताना या प्रकरणात अभिनेत्रीने राजकीय व्यक्तींना सहभागी केले होते.
त्यावेळी माझी निराशा झाली
आता शशीलाल नायरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या प्रकरणात त्यांची काय बाजू होती, यावर वक्तव्य केले आहे. दिग्दर्शकाने नुकतीच फ्रायडे टॉकीजला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना, “या चित्रपटासाठी मला नवीन चेहरा हवा होता. कोणीतरी अशी मुलगी पाहिजे होती, जी मॉडेलसारखी दिसेल. मला या चित्रपटात एक बारीक मुलगी पाहिजे होती. मी मनिषाला याबद्दल सांगितले, तेव्हा तीने मला म्हटले की मी वजन कमी करेन, जीममध्ये जाईन, व्यायाम करेन. तिने हेसुद्धा म्हटले की या चित्रपटात काम करण्याचे मी मानधनही घेणार नाही. तिने हे सगळे बोलल्यानंतर मी तयार झालो. मी तिला वजन कमी करण्यासाठी दोन महिने दिले. पण, तिने वजन कमी केले नाही.”
“जेव्हा ती शूटिंगच्या पहिल्या दिवशी आली आणि मी तिला पाहिले, त्यावेळी माझी निराशा झाली. तिचे वजन खूप जास्त होते, अशा प्रकारे आम्ही तो चित्रपट कसा बनवणार होतो? मी तिच्याबरोबर चर्चा केली. चित्रपटात एक मुलगा एका मुलीचा पाठलाग करतो, असे सीन होते. जर कोणी असे करत असेल, तर त्या मुलीने तसे दिसायला हवे. मनीषा जशी त्यावेळी दिसत होती, ती त्या प्रकारचे सीन कसे करू शकणार होती? जेवणाच्या ब्रेकमध्ये आमची खूप मोठी मीटिंग झाली. आम्ही ठरवले की जे क्लोजअपचे शॉट असतील तिथे मनिषाचे शॉट घेऊ आणि जे लांबून दिसणार होते तिथे तिची ड्युप्लिकेटचे शूटिंग घेऊ. मला मनीषाला नाराज करायचे नव्हते किंवा घरी जा असे सांगायचे नव्हते. मनीषानेसुद्धा खूप मदत केली. कारण-मनीषा व तिच्या ड्युप्लिकेटने तेच कपडे वापरले होते.”
याआधी दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शकाने म्हटले होते की हे सगळे मनीषाने राजकारणात जाण्यासाठी केले असावे, असे मला वाटते. मला इतकी वाईट परिस्थिती कधीच नको होती. मनीषा माझ्या कुटुंबासारखी होती.मनीषा आणि मी पुन्हा कधीच मित्र होऊ शकत नाही. १५ वर्षांच्या आठवणी उद्ध्वस्त झाल्या. मला वाटते की तिने याला अहंकाराचा मुद्दा बनवायला नको होता.
दरम्यान, पूर्वी ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल बोलताना मनीषाने म्हटले होते, “जे ड्युप्लिकेटबरोबर जे सीन शूट केले होते, ते काढले जावेत, अशी माझी इच्छा होती. मला वाटते की पोस्टर होते ते अत्यंत आक्षेपार्ह होते. याबरोबरच, जर आता हा चित्रपट सगळीकडे नफा कमवत असेल तर मी माझे मानधन का घेऊ नये. मला त्या नफ्यातील माझा वाटा हवा आहे.”