बॉलीवूड अभिनेता संजय दत्त(Sanjay Dutt)ला १९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्याच्यावर शस्त्र बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. हा काळ संजय दत्त आणि त्याचे वडील दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांच्यासाठी खूप कठीण होता. काही दिवसांपूर्वी निर्माते राजन लाल यांच्या बायोग्राफीच्या प्रकाशन सोहळ्यात दत्त कुटुंबाचे जवळचे मित्र, अभिनेते-खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी संजय दत्त बरोबरच्या त्यांच्या नात्याबद्दल वक्तव्य केले. बाळासाहेब ठाकरे यांनी संजय दत्त याला तुरूंगातून बाहेर येण्यासाठी मदत केली होती. तसेच संजय दत्त सध्या त्यांच्या आयुष्यातून गायब झाला आहे. याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले, “सुनिल दत्त हे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे होते. मुंबई दंगली दरम्यान ते, मी , राजन लाल रोज संध्याकाळी एकमेकांबरोबर बसत असू. त्या काळात दत्त साहेबांवर एक मोठे संकट कोसळले होते. त्यांचा मुलगा संजय दत्त तुरूंगात होता.” शत्रुघ्न सिन्हा पुढे बोलताना म्हणाले की, संजय दत्तला अटक झाल्याने, तो तुरूंगात असल्याने आम्ही सर्वजण चिंतेत होतो आणि त्याच्याबद्दल अगदी मनापासून काळजी करत होतो. त्याला कसे बाहेर काढले जावे, याची आम्हाला काळजी लागली होती.
सुनील दत्त यांनी बाळासाहेब ठाकरे यांची मदत मागितली होती, अशी आठवण सांगत शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले, “आम्ही नशीबवान होतो की महाराष्ट्राचे सिंह, वडीलांसारखे बाळासाहेब ठाकरे आमच्याबरोबर होते. आम्ही सुनील दत्तची त्यांच्याशी ओळख करून दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी संजय दत्तच्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. ज्या दिवशी तो तुरूंगातून बाहेर आला तो आमच्याबरोबर होता. तो बाहेर आल्यानंतर सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन तो थेट आमच्या घरी आला. त्यानंतर आम्ही राजन लाल यांच्या घरी गेलो. अनेक तास गप्पा मारल्या,” अशी आठवणही त्यांनी सांगितले.
शत्रुघ्न सिन्हांनी पुढे म्हटले की संजय दत्तला हल्ली भेटता येत नाही, तो आता कोणालाच भेटत नाही याबद्दल विचार करून वाईट वाटते. त्यानंतर आम्ही संजयला भेटण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. विशेषतः राजन लाल यांनी बऱ्याचदा प्रयत्न केला. त्यांनी आमच्यासमोर आणि आमच्या माध्यमातून देखील अनेक प्रयत्न केले. पण संजय दत्त आम्हाला भेटलाच नाही. पण याचा अर्थ असा नाही की तो वाईट आहे. त्याची स्वत:ची कारणे, समस्या असू शकतात किंवा तो त्याच्या कामात व्यग्र असू शकतो”, असे म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी संजय दत्तची भेट होत नसल्याची खंत व्यक्त केली.