Shatrughan Sinha slams Mukesh Khanna: ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांनी सोनाक्षी सिन्हावर पाच वर्षांपूर्वी घडलेल्या प्रसंगावरून नुकतीच टीका केली. २०१९ मध्ये तिने ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिला रामायणसंदर्भात एका प्रश्नाचं उत्तर आलं नव्हतं. त्याचा उल्लेख करत मुकेश खन्ना यांनी ही तिची नव्हे तर तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांची चूक असल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांच्या संस्कारावर प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर भडकलेल्या सोनाक्षीने त्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. आता शत्रुघ्न सिन्हा यांनीही या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
नेमके प्रकरण काय?
सोनाक्षीने २०१९ मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये हजेरी लावली होती. शोमध्ये तिला ‘हनुमानाने संजीवनी बुटी कुणासाठी आणली होती?’ असा प्रश्न विचारला. त्याचे चार पर्याय सुग्रीव, लक्ष्मण, सीता आणि राम हे होते. सोनाक्षीला उत्तर आलं नाही, त्यामुळे तिने लाइफलाइन वापरली होती.
काय म्हणाले होते मुकेश खन्ना?
आताच्या पिढीबद्दल बोलताना मुकेश खन्ना म्हणाले, “हनुमानाने संजीवनी बुटी कोणासाठी आणली होती, तेही एका मुलीला माहीत नव्हतं.” ही मुलगी म्हणजे सोनाक्षी सिन्हा आहे का, असं विचारल्यावर त्यांनी होकार दिला. “हे त्या मुलीवर योग्य संस्कार न झाल्याने झालं. तिच्या वडिलांचं नाव शत्रुघ्न सिन्हा आहे, तिच्या भावांची नावं लव आणि कुश आहेत तरी तिला रामायणाबद्दल माहिती नाही. पण माझ्या मते यात तिची चूक नाही, तिच्या वडिलांची चूक आहे. त्यांनी मुलांना याबद्दल का शिकवलं नाही? ते इतके आधुनिक का झाले?” असं त्यांनी म्हटलं.
हेही वाचा – भारताला मोठा धक्का, ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर; गुनीत मोंगाची ‘अनुजा’ झाली शॉर्टलिस्ट
शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया
बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “मला वाटतं की सोनाक्षीने रामायणावरील प्रश्नाचे उत्तर न दिल्याने कोणालातरी अडचण आहे. पण रामायणाशी संबंधित सर्व गोष्टींमध्ये तज्ज्ञ होण्यासाठी या माणसाची पात्रता काय आहे? आणि त्याला हिंदू धर्माचा रक्षक कोणी बनवलं आहे?”
मला माझ्या तिन्ही मुलांचा अभिमान – शत्रुघ्न सिन्हा
आपल्या मुलीचा बचाव करताना शत्रुघ्न म्हणाले की सोनाक्षीला रामायणाशी संबंधित एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, याचा अर्थ ती चांगली हिंदू नाही, असं नाही. “मला माझ्या तिन्ही मुलांचा अभिमान आहे. सोनाक्षी स्वबळावर स्टार बनली आहे. मला तिला लाँच करावं लागलं नाही. सोनाक्षी एक अशी मुलगी आहे जिचा कोणत्याही वडिलांना अभिमान वाटेल. सोनाक्षी रामायणाशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही, याचा अर्थ ती चांगली हिंदू नाही असा होत नाही. तिला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही,” असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
हेही वाचा – ॲटलीच्या दिसण्यावरून कमेंट करण्याबद्दल कपिल शर्माने दिलं उत्तर; म्हणाला, “मेंढरासारखे कोणाचेही…”
सोनाक्षीने दिलं मुकेश खन्ना यांना उत्तर
सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मुकेश खन्ना यांना उत्तर दिलं. “खूप वर्षांपूर्वी मी एका कार्यक्रमात रामायणसंदर्भातील प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकले नाही, ही माझी नव्हे तर माझ्या वडिलांची चूक आहे, असं तुम्ही म्हणालात. मी तुम्हाला आठवण करून देते की त्या दिवशी हॉट सीटवर दोन महिला होता, ज्यांना त्याच प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हते, पण तुम्ही फक्त माझे नाव घेता, त्याचं कारणही स्पष्ट आहे,” असं सोनाक्षी म्हणाली.
“यापुढे तुम्ही माझ्या वडिलांनी माझ्यावर केलेल्या संस्कारांबद्दल काहीही बोलाल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही माझ्या संगोपनाबद्दल असं घाणेरडं वक्तव्य केलं, तरीही त्यांच्याच संस्कारांमुळे मी आज जे बोलले ते आदराने बोलले आहे”, अशा शब्दांत सोनाक्षीने मुकेश खन्नांना उत्तर दिलं.