बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली आहे. नुकत्याच आलेल्या जवानमध्ये ३९ वर्षांच्या रिद्धी डोगराने ५७ वर्षांच्या शाहरुख खानच्या आईची भूमिका केली होती. याच प्रमाणे अभिनेत्री शेफाली शाहने एका चित्रपटात ५ वर्षांनी मोठ्या अक्षय कुमारच्या आईची भूमिका केली होती. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या एक्सप्रेस अड्डामध्ये पुन्हा कधीच अक्षयच्या आईची भूमिका करणार नसल्याचं शेफाली शाह म्हणाली.
“मी तिच्याइतकी सुंदर नाही पण…”, ‘या’ अभिनेत्रीने साकारावी आपली भूमिका, सुधा मूर्तींची इच्छा
सोमवारी मुंबईत ‘एक्सप्रेस अड्डा’मध्ये इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका यांच्याशी शेफाली शाह, जिम सरभ व वीर दास यांनी संवाद साधला. या तिघांना २०२३ च्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळालं आहे. यावेळी शेफालीने अत्यंत वाईट वागणूक देणाऱ्या एका दिग्दर्शक आणि अभिनेत्याबरोबर काम केल्याचा खुलासा केला. तसेच आपण कधीही पडद्यावर अक्षय कुमारच्या आईची भूमिका करणार नाही, असंही तिने नमूद केलं.
बॉलीवूडचे यशस्वी कलाकार कोण आहेत? शेफाली शाहने मांडलं मत; म्हणाली, “माझ्या मते…”
शेफालीला सेटवरील हायरारकीबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा ती म्हणाली, “मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की मला खूप चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळालं, त्याचा मला आनंद आहे. असं उत्तर ऐकायला चांगलं वाटतं म्हणून मी बोलत नाहीये, तर हे खरं आहे. मी कदाचित एक दिग्दर्शक व एका अभिनेत्याबरोबर काम केले असेल, जे अत्यंत वाईट वागणूक देणारे होते. त्याशिवाय, मी सर्व अशा दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे, ज्यांना वाटतं की कलाकार फक्त कलाकार नसून सहकारी असतात.” त्यानंतर शेफाली हसून म्हणाली, “मी वचन देते की मी आयुष्यात पुन्हा कधीच अक्षय कुमारच्या आईची भूमिका करणार नाही.”
दरम्यान, शेफालीने २००५ मध्ये ‘वक्त: द रेस अगेन्स्ट टाइम’ या चित्रपटात अक्षय कुमारच्या आईची भूमिका केली होती. ती त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होती. त्यावेळी शेफाली ३२ वर्षांची होती, तर अक्षय ३७ वर्षांचा होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि प्रियांका चोप्रा यांच्याही भूमिका होत्या.