आपल्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या अभिनेत्री शेफाली शाह या त्यांच्या दमदार भूमिकांमुळे आणि वेबसीरिजमधील सशक्त स्त्रीच्या पात्रांमुळे लक्षात राहतात. नुकतंच ‘दिल्ली क्राइम २’ या वेबसीरिजसाठी शेफाली यांनी उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ‘आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांचं’ नामांकन जाहीर झालं. यानिमित्त त्यांनी ‘इंडियन एक्सप्रेस ग्रुप’च्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली व दिलखुलास गप्पा मारल्या.
या मुलाखतीदरम्यान शेफाली यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. आपले पती विपुल अमृतलाल शाह यांचा चित्रपट ‘द केरला स्टोरी’चा टीझर शेअर केल्यावर त्यांना प्रचंड टीकेचा सामना करावा याविषयी त्या बोलल्या आहेत. त्याविषयी बोलताना शेफाली म्हणाल्या, “माझा राजकारणाशी दूरदूरपर्यंत काहीच संबंध नाही. सोशल मीडियावर मला लोकांचं भरपूर प्रेम मिळतं. परंतु जेव्हा मी ‘द केरला स्टोरी’चा टीझर शेअर केला तेव्हा मला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. जसंकाही लोक एका रात्रीत माझा तिरस्कार करू लागले.”
आणखी वाचा : “भारतीय पुरुष असभ्य…” प्रसिद्ध अभिनेत्री सयानी गुप्ताने व्यक्त केली खंत; इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल
या चित्रपटात भूमिका साकारण्याबद्दल शेफाली म्हणाल्या, “जर मला या चित्रपटातील भूमिकेसाठी पुराव्यांसह विचारण्यात आलं असतं तर नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. ‘दिल्ली क्राइम’सारखी गोष्ट जितकी महत्त्वाची आहे तितकीच हीसुद्धा आहे. मी चित्रपटाची स्क्रिप्ट आणि सरकारकडून आलेली वक्तव्य मी वाचली होती त्यामुळे मला विचारणा झाली असती तर मी नक्कीच भूमिका केली असती, अगदी यातील हिंदू महिलेची भूमिकाही मी केली असती कारण माझ्यासाठी ती महिलेची कथा होती, धर्माची नव्हे. ही आतंकवादाची कथा होती.”
अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी, सोनिया बलानी, यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘द केरला स्टोरी’ हा केरळमधील ३२००० महिलांच्या धर्मांतरावर भाष्य करणारा चित्रपट आहे. यावर्षी मे महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने २५० कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटावर प्रचंड टीकाही झाली. सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं तर विपुल शाह यांनी याची निर्मिती केली होती.