‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलने आता बॉलीवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे. शहनाजने ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर अभिनेत्री बॉलीवूडच्या प्रत्येक पार्टी आणि कार्यक्रमात हजेरी लावताना दिसते. आता लवकरच शहनाज ‘थॅंक्यू फॉर कमिंग’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यग्र आहे. नुकत्याच ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत शहनाजने बॉलीवूड इंडस्ट्रीबाबत आपलं मत मांडलं आहे.
हेही वाचा : महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत ‘कोहली फॅमिली’चं स्किट नव्या रुपात? नम्रता संभेरावच्या फोटोने वेधलं लक्ष
शहनाजला “चित्रपटाच्या सेटवर तिला कधी भेदभावाचा सामना करावा लागला का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, “मला हा चित्रपट करताना प्रत्येकवेळी समानतेची वागणूक देण्यात आली. कधीही भेदभाव केल्यासारखं वाटलं नाही. मोठ्या कलाकारांना वेगळी वागणूक आणि नवख्या कलाकारांना वेगळी… काही कलाकारांना व्हॅनिटी व्हॅन वेगळ्या दिल्या जातात, असे भेदभावाचे प्रकार अनेकदा घडतात परंतु, आमच्या सेटवर असं झालं नाही.”
शहनाज पुढे म्हणाली, “प्रत्येक सेटवर तुम्हाला चांगली वागणूक मिळेल असं नाही. सुदैवाने मला आतापर्यंत बॉलीवूडमध्ये चांगले अनुभव आले आहेत. अनेकजण सांगतात बॉलीवूडमध्ये चांगले लोक नाहीत पण, असं अजिबात नाही…काही लोक खरंच खूप चांगले आहेत.”
हेही वाचा : “आम्हीच नंबर १”, TRP च्या चुकीच्या बातम्यांबद्दल जुई गडकरीने मांडलं मत; म्हणाली, “आम्हाला चॅनेलकडून…”
दरम्यान, शहनाजने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यापूर्वी तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शहनाज गिलला ‘बिग बॉस’च्या १३ व्या पर्वामुळे लोकप्रियता मिळाली होती. तिला पंजाबची कतरिना कैफ असंही म्हटलं जातं.