भारतीय चित्रपट क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या ‘बॅन्डिट क्वीन’ या चित्रपटाला आज ३० वर्षे पूर्ण होत आहेत. १९९४ च्या कान्स फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाची चर्चा झाली आणि तिथूनच हा चित्रपट जगभरात चर्चेचा विषय बनला. ‘मिस्टर इंडिया’ आणि ‘मासूम’सारखे अत्यंत वेगळे चित्रपट देणाऱ्या शेखर कपूर यांना चंबळच्या डाकूंवर आणि मुख्यत्वे फूलन देवीवर चित्रपट का करावासा वाटला हा प्रश्न त्यांना बऱ्याचदा विचारण्यात आला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शकाने याचे उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकांना अस्वस्थ करणारा हा चित्रपट बनवण्यात नेमक्या कोणत्या अडचणी आल्या अन् त्यावर मात करत शेखर कपूर यांनी कशारीतीने याचं चित्रीकरण पूर्ण केलं याबद्दल शेखर यांनी खुलासा केला. इतकंच नव्हे तर चित्रपटातील एका भयावह अशा बलात्काराच्या सीनबद्दल आणि तो चित्रित करताना आलेल्या अनुभवाबद्दलही शेखर कपूर उघडपणे बोलले आहेत. शेखर कपूर यांच्या करिकीर्दीतील हा चित्रपट सर्वात आव्हानात्मक होता असंही त्यांनी म्हंटलं.

आणखी वाचा : एकेकाळी आंबे विकायचा अमिताभ बच्चन यांचा जावई; आज आहे कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक

शेखर कपूर म्हणाले, “मी स्वतःला एक संवेदनशील माणूस कसा समजू शकतो जेव्हा मी या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे पीडित महिलांच्या समस्येचा स्वीकार करत नाही. त्यामुळे ‘बँडिट क्वीन’ हा चित्रपट म्हणजे माझ्या स्वतःवर असलेल्या प्रचंड रागातूनच निर्माण झाला. हा अतिशय संतप्त चित्रपट आहे, मी इतका असंवेदनशील कसा काय झालो? असे प्रश्न मला बऱ्याच लोकांनी विचारले. चित्रपट झाल्यावर त्याची प्रतिक्रिया पाहताना मी हैराण व्हायचो, लोक अत्यंत संतप्त होऊन बाहेर पडताना मी पाहिलं आहे.”

हा चित्रपट फूलन देवीवर होता जीच्यावर अत्यंत भयानक प्रकारचा शारीरिक अत्याचार आणि शोषण झाले अन् यानंतरच तिने एकूणच व्यवस्थेविरोधात बंड पुकारलं व राजकारणात प्रवेश घेतला. चित्रपटातील सामूहिक बलात्काराचा एक सीनही दाखवण्यात आला जो फारच आव्हानात्मक होता.

याविषयी बोलताना शेखर कपूर म्हणाले, “मला बलात्कार पीडित मुलीचा अन् बलात्कार करणाऱ्यांचा दृष्टिकोन समजून घेणं फार गरजेचं होतं. मी माझ्या संपूर्ण क्रू मेंबर्स तसेच कलाकारांना सांगितलं होतं की आपण कोणतीही काल्पनिक गोष्ट दाखवत नाही आहोत, जे समाजात घडलं आहे त्याचंच प्रतिबिंब यात दिसणार आहे. चित्रपटातील सामूहिक बलात्काराचा सीन अन् त्यामागची मानसिकता समजून घेणं हे माझ्यासाठी फार कठीण होतं. मी दोन-तीन दिवस स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं.”

पुढे शेखर म्हणाले, “आम्ही तो सीन आमचे सिनेमॅटोग्राफर अशोक मेहता यांच्याबरोबर शूट केला. आम्ही त्यावेळी फक्त बाहेर थांबून दरवाजा उघडणे आणि बंद होणे तसेच वेगवेगळी माणसं आत शिरणे एवढंच चित्रीकरण करत होतो. एका महिलेवर सलग दोन रात्री सामूहिक बलात्कार होतानाचा विचार माझ्या मनात आला अन् मी प्रचंड अस्वस्थ झालो. मी दरवेळी बाहेर जायचो, उलटी करायचो अन् परत येऊन अशोकला सांगायचो की मी हा सीन शूट करू शकत नाही, पण तरी त्याने तो सीन माझ्याकडून शूट करून घेतला. मी सतत बाहेर जाऊन उलटी करायचो अन् पुन्हा येऊन शूट करायचो.”