अभिनेता शेखर सुमन सध्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ सीरिजमुळे चर्चेत आहेत. त्यांनी नुकतंच आयुष्यातील एका कठीण काळाबद्दल सांगितलं. त्यांच्या मुलाचं ११ व्या वर्षी एका दुर्मिळ आजाराने निधन झालं होतं. त्याचं नाव आयुष होतं आणि तो त्यांचा मोठा मुलगा होता. मुलाची प्रकृती गंभीर असूनही एका दिग्दर्शकाने त्यांना शूटिंगसाठी बोलावलं होतं, त्यावेळी आजारी मुलाने आपला हात पकडून न जाण्याची विनंती केली होती, तो प्रसंग शेखर सुमन यांनी सांगितला. मुलाच्या मृत्यूनंतर घरातील सर्व मूर्ती फेकून दिल्या होत्या, असा खुलासा त्यांनी केला.
“चमत्कार कधीच होत नाहीत,” असं कनेक्ट एफएम कॅनडाला दिलेल्या मुलाखतीत शेखर म्हणाले. त्यांनी एक प्रसंग सांगितला जेव्हा मुलगा आजारी असताना त्यांना दिग्दर्शकाने शूटिंगला बोलावलं होतं. “एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता आणि आयुष खूप आजारी होता. माझ्या मुलाची अवस्था गंभीर होती, ती परिस्थिती समजून घेत दिग्दर्शकाने मला दोन-तीन तास शूटिंगसाठी येण्याची विनंती केली होती. मी नकार दिला, पण तो म्हटला की त्याचं खूप नुकसान होईल. मग मी त्याला होकार दिला. मी निघणार होतो तेवढ्यात आयुषने माझा हात धरला आणि म्हणाला, ‘पप्पा, आज नका जाऊ, प्लीज’. पण मी त्याचा हात सोडवला आणि त्याला वचन दिलं की मी लवकरच परत येईन, तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही,” असं शेखर सुमन म्हणाले.
आयुषच्या निधनानंतर देवावरचा विश्वास उडाला होता आणि आपण घरातील मंदिर बंद केलं होतं, असं शेखर यांनी सांगितलं. “मी सर्व धार्मिक मूर्ती काढून घराबाहेर फेकल्या व मंदिर बंद केलं होतं. मी म्हणायचो की ज्या देवाने मला एवढं दु:ख दिलं, माझ्या सुंदर व निरागस मुलाचा जीव घेतला, त्या देवाकडे मी कधीच जाणार नाही,” असं शेखर म्हणाले. आयुष आजारी असताना त्याचा त्रास इतका वाढला होता की त्याच्या निधनासाठी शेखर सुमन यांची पत्नी प्रार्थना करायची. या दुःखातून आपण अजुनही सावरलो नसून आयुषची आठवण येते, असं शेखर सुमन यांनी सांगितलं.
१९८९ मध्ये मुलगा आजारी आहे हे कळाल्यावर शेखर यांच्या आयुष्यात खूप अडचणी आल्या होत्या. त्यावेळी करिअर, आयुष्य, कुटुंब अगदी सगळं संपल्यासारखं वाटत होतं. एकेदिवशी मुलगा सोडून जाणार हे माहित असूनही मी प्रत्येक दिवस त्याच्यासोबत घालवायचो, असं त्यांनी सांगितलं. “मला जेव्हा माझ्या मुलाच्या दुर्मिळ आजाराबद्दल कळालं तेव्हा तो आठ महिने जगेल, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण तो आठ महिने नव्हे तर चार वर्षे जगला,” असं शेखर सुमन म्हणाले.
शेखर मुलाला उपचारासाठी लंडनला घेऊन गेले होते, परंतु जोखीम असल्याने डॉक्टरांनी हृदय प्रत्यारोपण करण्यास नकार दिला. मुलाला जगभरातील अनेक डॉक्टरांकडे नेलं होतं, मुलाला बरं व्हावं यासाठी बौद्ध धर्माकडे वळलो, पण चमत्कार घडत नाही हे मला कळून चुकलं, असंही शेखर सुमन यांनी नमूद केलं. शेखर सुमन यांच्या मोठ्या मुलाचं निधन झालं असून त्यांना अध्ययन सुमन नावाचा एक मुलगा आहे.