Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरावर आणि ऑफिसवर काही दिवसांपूर्वीच ईडीकडून धाड टाकण्यात आली. ईडीने धाड टाकल्याने शिल्पाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशात नुकतीच तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ईडीची धाड पडल्यानंतर अभिनेत्रीची ही पहिलीच पोस्ट आहे. यामध्ये तिने छापेमारीबद्दल स्पष्टपणे कोणतंही भाष्य केलेलं नाही. मात्र, या घटनेनंतर आपलं मानसिक आरोग्य कसं सांभाळावं आणि स्वत:ची काळजी कशी घ्यावी यावर अभिनेत्रीने पोस्ट लिहिली आहे.

शिल्पाने आठवड्याची सुरुवात करताना इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत तिने यावर कॅप्शनही लिहिलं आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने योग करणे किती महत्वाचे आहे हे सांगितलं आहे. तसेच तिने यात योग केल्याने आपल्या शारीरीक आणि मानसिक आरोग्याला काय फायदा होतो, याचीही माहिती सांगितली आहे.

हेही वाचा : नागा चैतन्यशी लग्नगाठ बांधण्याआधी सोभिताने शेअर केले ‘पेल्ली कुथुरु’ समारंभाचे फोटो; ही तेलुगू प्रथा आहे तरी काय?

व्हिडीओच्या कॅप्शनध्ये शिल्पाने लिहिलं की, “स्पाइनल वेव्ह फ्लो आपल्या मणक्यातील अडथळे सोडण्यासाठी काम करते. याने मज्जासंस्थेला आराम मिळतो. याने तुमच्या शरीरालाही आराम मिळतो, तसेच तुम्हाला तणावमुक्त आणि प्रोत्साहित राहण्यासाठी मोठी मदत होते. योग तुमच्या जीवनात फलदायी ठरतो. आयुष्यात लाटांप्रमाणे कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते.” पुढे शिल्पाने “प्रत्येक क्षण जगा, लाटेप्रमाणे उंच झेप घ्या. मात्र, असे करताना तुमचा पाण्यासारखे प्रवाही राहा”, असंही तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

तसेच अभिनेत्रीने सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच एक इन्स्टाग्राम स्टोरीही ठेवली आहे. यात तिने प्रत्येकाच्या सुखी आयुष्यासाठी महत्वाच्या असलेल्या तीन गोष्टी सांगितल्या आहेत. स्टोरीमध्ये तिने लिहिलं, “तुम्हाला दररोज तीन गोष्टींवर विजय मिळवणे महत्वाचे आहे. पहिला शारीरिक विजय. यामध्ये व्यायाम, निरोगी खाणे, त्वचेची काळजी घेणे, विश्रांती घेणे, तुमच्या शरीराची काळजी घेणे या गोष्टी येतात. दुसरा मानसिक विजय, त्यासाठी वाचन, लेखन, काही तरी निर्माण करणे आणि शिकणे या गोष्टींचा समावेश आहे. तिसरा आध्यात्मिक विजय, यामध्ये सजगता, ध्यान, कृतज्ञता या गोष्टी आहेत. माझी आठवड्याची सुरुवात अशी झाली आहे, तुमची सुरुवातही अशीच असेल”, असं तिने या स्टोरीमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा : कडाक्याची थंडी, वैष्णोदेवीला पायी प्रवास अन्…; एका गाण्याच्या शूटिंगसाठी धर्मशाळेत राहिलेले सुपरस्टार राजेश खन्ना

अशात शिल्पाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, “मी तुमचं समर्थन करतो आणि हे पुष्कळ आहे.” तर आणखी एका युजरने लिहिलं, “हा व्हिडीओ ईडी अधिकाऱ्यांसाठी आहे.” तसेच काही युजरने यावरून शिल्पाला नकारात्मक कमेंटही केल्या आहेत. “तुमच्या मागे ईडी आणि सीबीआय आहे”, “ईडी वाल्यांना हे सर्व दाखवून त्यांना पुन्हा मागारी परतवून लावण्यासाठीचे प्रयत्न”, अशाही कमेंट काही युजर्सनी केल्या आहेत.