Shilpa Shetty on investment in baby care brand: शिल्पा शेट्टी अनेकदा तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तसेच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. आता मात्र तिच्या चर्चेत येण्याचे कारण मात्र वेगळेच ठरले आहे. अभिनेत्रीने एका कंपनीत अगदी कमी गुंतवणूक केली होती. आता तिला मोठा नफा झाल्याची माहिती समोर आली आहे.
आठ वर्षापूर्वी शिल्पा शेट्टीने मामाअर्थ (Mamaearth) या कंपनीत ६ कोटींची गुंतवणूक केली होती. त्यावेळी त्या कंपनीची किंमत ही ३५ कोटी होती. या आठ वर्षात या कंपनीने मोठी झेप घेतली आहे. आता ही कंपनी आता युनिकॉर्न म्हणून ओळखली जात आहे. या कंपनीची किंमत आता १ बिलीयन डॉलर इतकी आहे. शिल्पाने याबद्दल नुकतेच वक्तव्य केले. या कंपनीचे संस्थापकांचा कामाप्रति असलेल्या समर्पणावर माझा विश्वास होता. कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून माझे मानधन त्यांना परवडत नव्हते. त्यामुळे मी त्यांना त्यांच्या कंपनीत हिस्सा मागितला.
शिल्पा शेट्टी काय म्हणाली?
शिल्पा शेट्टीने नुकताच ‘फेमिना इंडिया’शी संवाद साधला. यावेळी शिल्पा कंपनीबाबत म्हणाली, “आठ वर्षांपूर्वी माझी वरूण आणि गझल अलाघ यांच्याशी माझी भेट झाली होती. मी माझ्या मुलांसाठी चांगला चांगला शाम्पू घेण्यासाठी परदेशात जात असे, त्यावेळी ते माझ्याकडे मामाअर्थच्या प्रॉडक्टची कल्पना घेऊन माझ्याकडे आले होते. त्यांच्याकडे मॉस्किटो पॅचेस आणि बेबी शॅम्पू होते. या बेबी प्रॉडक्ट ब्रँडला नंबर वन बनवायचे हा यावर वरूण ठाम होता आणि गझलबरोबर त्याने ते करून दाखवले.
पुढे अभिनेत्री म्हणाली, “मला वाटतं की त्यावेळी कंपनीचा व्यवसाय हा जवळजवळ ३५ कोटींचा होता. मी त्यामध्ये गुंतवणूक केली, कारण- ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून माझे मानधन देणे त्यांना परवडत नव्हते. मी त्यांना कंपनीतील एक हिस्सा मागितला. तो द्यायला ते तयार झाले. ही कंपनी आता युनिकॉर्न बनली आहे. त्यामुळे मी श्रीमंत झाले आहे.
शिल्पा पुढे असेही म्हणाली, “मी अशाच ब्रँडबरोबर काम करते, ज्याच्यावर माझा विश्वास आहे. मी पैशासाठी कोणत्याही उत्पादनांबरोबर काम करू शकत नाही. पान मसालासारखी उत्पादने तुम्हाला खूप पैशांची ऑफर देतात. पण मी नैतिकतेशी तडजोड करीत नाही. कुठल्याही उत्पादनांबरोबर काम करताना माझ्या नैतिकतेबरोबर तडजोड केली जात नाही ना, याची मी खात्री करते.”
शिल्पा अभिनेत्री असण्याबरोबरच एक उद्योजिकादेखील आहे. मुंबईतील एका रेस्टॉरंटची ती मालकीण आहे. बास्टियन गार्डन सिटी असे या रेस्टॉरंटचे नाव आहे. याबरोबरच अभिनेत्री डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेतही दिसते. काही वेळा सोशल मीडियावर आरोग्याविषयी व्हिडीओ पोस्ट करते. योगा साठी अभिनेत्री विशेष ओळखली जाते. तिच्या फिटनेसची कायमच चर्चा होताना दिसते.