आपल्या फिटनेससाठी ओळखली जाणारी एव्हरग्रीन बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं व्यावसायिक तसेच खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. शिल्पा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नुकतंच तिने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे व राम मंदिराच्या उभारणीसाठी तिने पंतप्रधानांचे आभारही मानले आहेत.
सोशल मीडियावर शिल्पाचं हे पत्र चांगलंच व्हायरल झालं आहे. शिल्पा पत्रात लिहिते, “आदरणीय मोदीजी, काही लोक इतिहास वाचतात, काही त्यातून शिकतात, पण तुमच्यासारखी लोक इतिहास बदलतात. तुम्ही रामजन्मभूमीचा ५०० वर्षांपूर्वीचा इतिहास बदलून दाखवला आहे. तुमचे मनापासून आभार. या शुभ कार्यानंतर प्रभू श्रीराम यांच्याबरोबर तुमचंही नाव जोडलं गेलं आहे. नमो राम! जय श्री राम!”
भाजपा महाराष्ट्र या ट्विटर अकाऊंटनेही शिल्पाचं हे पत्र त्यांच्या वॉलवर पोस्ट केलं आहे. आपल्या ट्वीट मध्ये त्यांनी लिहिलं, “सुप्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीजी यांनी नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पत्र लिहून त्यांचे आभार मानले. ५ शतकांपासून श्रीरामांना वनवास घडत होता. अखेर तो वनवास संपला. तेही मोदीजींच्या प्रयत्नांमुळे.. यासाठीच शिल्पाजींनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.”
आणखी वाचा : “माझ्या कमाईचा मुख्य स्त्रोत..” पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतचा मोठा खुलासा
गेल्या महिन्यात २२ जानेवारीला अयोध्या येथे राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रिटीजना निमंत्रण देण्यात आलं होतं. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, कतरिना कैफ, आयुष्मान खुराना, रोहित शेट्टी आदि सेलिब्रिटीजनी या सोहळ्याला हजेरी लावली. शिल्पा शेट्टीला या सोहळ्यासाठी निमंत्रण नव्हते पण तरी तिने पत्राद्वारे पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.