मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेस आणि अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. २०२२ साली तिचा ‘निकम्मा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला तिकीट खिडकीवर फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता, मात्र आता पुन्हा एकदा शिल्पा शेट्टी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेली आहे. बाईपणाची गोष्ट सांगणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ या मराठी स्त्रीप्रधान चित्रपटाला सर्वच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. आता पुन्हा एकदा सगळ्या नात्यातून आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या गृहिणीचा बाई होण्यापर्यंतचा प्रवास शिल्पा शेट्टीच्या ‘सुखी’ या स्त्रीप्रधान चित्रपटातून उलगडणार आहे. हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘सुखी’ या चित्रपटात सुखविंदर उर्फ सुखी कालरा या ३८ वर्षीय पंजाबी गृहिणी आणि तिच्या मैत्रिणींची गोष्ट पाहायला मिळणार आहे. शाळेच्या पुनर्भेट कार्यक्रमासाठी सुखी आणि तिची मैत्रिण २० वर्षांनंतर दिल्लीत पोहोचतात. या भेटीनंतर पुन्हा एकदा १७ वर्षांची तरुणी होऊन जगण्याचे सुख अनुभवू पाहणाऱ्या सुखीसारख्या प्रत्येक स्त्रीची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे. शाळकरी मुलगी, तरुणी, प्रेयसी, पत्नी ते आई अशा विविध भूमिकी स्त्री चोख पार पाडत असते. या सगळ्या भूमिका पार पडत असताना आपली राहिलेली स्वप्ने, इच्छा पूर्ण करणाऱ्या सुखीचा स्त्रीत्व गवसण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे.

हेही वाचा >>>रणवीरसह ‘डॉन ३’मध्ये काम करण्याची इच्छा, अभिनेत्याने थेट दीपिका पदुकोणला केला मेसेज; ती रिप्लाय देत म्हणाली, “मी तुला…”

या चित्रपटातून सोनल जोशी दिग्दर्शनात पदार्पण करत असून भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा आणि शिखा शर्मा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहेत. यात शिल्पा शेट्टीसोबतच कुशा कपिला, दिलनाज इराणी, पावलीन गुजराल, चैतन्य चौधरी आणि अमित साध यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तर चित्रपटाचे लेखन राधिका आनंद यांनी केले असून पटकथा पॉलोमी दत्ताने लिहिली आहे. ‘सुखी’ हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader