Shilpa Shinde : हेमा समितीचा अहवाल समोर आल्यापासून मॉलिवूडच्या अनेक कहाण्या समोर येत आहेत. मल्याळम सिनेसृष्टीतील मेक-अप आर्टिस्ट आणि अभिनेत्री तसंच सहाय्यक महिला दिग्दर्शकांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांना वाचा फोडली आहे. दरम्यान बॉलिवूडमधली आणि सीरियल विश्वातली अभिनेत्री शिल्पा शिंदेने तिला जो प्रसंग सहन करावा लागला त्याबद्दल आता वक्तव्य केलं आहे. शिल्पा शिंदेने सुरुवातीच्या दिवसात ऑडिशनच्या वेळी आलेला अनुभव कथन केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एका निर्मात्याने माझं शोषण केलं असं शिल्पा शिंदेने ( Shilpa Shinde ) सांगितलं आहे.
काय म्हटलं आहे शिल्पा शिंदेने?
शिल्पा शिंदेने ( Shilpa Shinde ) सांगितलं मी एकदा एका ऑडिशनसाठी गेले होते. तिथे मला एक सीन दिला गेला, तो सीन करायला मी तयारी दर्शवली कारण मी तेव्हा नवखी होते. मात्र नंतर काय घडतंय मला समजलं आणि मी तिथून बाहेर पडले, एका मुलाखतीत शिल्पा शिंदेने तिला आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे.
हे पण वाचा- ‘भाभीजी घर पर है’ फेम मराठामोळी शिल्पा शिंदे ‘या’ अभिनेत्याची तिसरी पत्नी होणार? चर्चांना उधाण
शिल्पा शिंदेला आलेला तो अनुभव
“१९९८ किंवा १९९९ चं वर्ष असेल. मी त्या निर्मात्याचं नाव घेणार नाही. त्यांनी मला सांगितलं हे कपडे घाल आणि ऑडिशन दे. मी ते कपडे घातले नाहीत. त्यानंतर तो निर्माता मला सांगू लागला मी तुझा बॉस आहे मला सेड्युस कर आणि खुश कर. मला वाटलं की सिनेमातला सीन करायला सांगत आहेत. त्यामुळे मी तसं करु लागले. त्यावेळी त्या निर्मात्याने माझं शोषण करण्याचा प्रयत्न केला. मी खूप घाबरुन गेले होते. त्यावेळी मी त्या निर्मात्याला धक्का दिला आणि तिथून बाहेर निघून आले. माझी अवस्था पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही समजलं की काय घडलं असेल. त्यानंतर मला तिथून जायला सांगितलं. त्यांना वाटलं होतं आता मी तिथे तमाशा करेन आणि मदत मागेन.” न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा शिंदेने ( Shilpa Shinde ) हा अनुभव सांगितला आहे.
मी त्या निर्मात्याचं नाव घेणार नाही
“मी त्या निर्मात्याचं नाव घेणार नाही. पण तो निर्माता हिंदी सिनेसृष्टीतला आहे. मी त्यांनी सांगितलेला सीन केला कारण तो फक्त निर्माता नाही तर अभिनेताही होता. मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही कारण त्यांची मुलं माझ्यापेक्षाही लहान असतील. मी त्यांचं नाव घेतलं तर त्यांना जास्त त्रास होईल” असं शिल्पा शिंदेने ( Shilpa Shinde ) सांगितलं.
मी नंतरही त्या निर्मात्याला भेटले
शिल्पा शिंदेने सांगितलं की मला जो अनुभव आला होता त्यानंतर काही वर्षांनी मी त्या निर्मात्याला पुन्हा भेटले. त्यावेळी त्यांनी माझ्याशी प्रेमाने चर्चा केली आणि मला त्यांनी ओळखलंही नाही. त्यामुळे मला त्यांनी एक फिल्म ऑफर केली. मी चित्रपट करणार नाही सांगितलं अशीही आठवण शिल्पा शिंदेने सांगितली.
भाभी जी घर पर है या सीरियलमधून घराघरांत पोहचलेल्या शिल्पाने सांगितलं की सिनेसृष्टीत काम करणाऱ्या असंख्य मुलींना असे अनुभव आले आहेत. काही माझ्याप्रमाणे पळून गेल्या आहेत. तर अनेकींनी जे घडतं य ते नाईलाजाने सहन केलं आहे. लैंगिक शोषण किंवा सेक्सची मागणी करणं हे घडतंच पण तुमच्याकडे ठामपणे नाही म्हणायचा पर्याय कायमच असतो.