बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) बिग बॉसच्या १८ व्या सीजनमध्ये सहभागी झाली होती. १०२ दिवस ती या घरात होती. मात्र, खेळाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात अभिनेत्रीला घराबाहेर जावे लागले. बिग बॉसचा सीजन संपल्यानंतरही अभिनेत्री विविध मुलाखतींमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे मोठी चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या वाढलेल्या वजनामुळे फराह खानने तिला ‘छैय्या छैय्या’मध्ये काम देण्यास नकार दिला होता, असा खुलासा केला होता. त्याबरोबरच अभिनेत्रीच्या बहिणीचा पती सुपरस्टार महेशबाबूने ती बिग बॉस १८ च्या घरात असताना तिला पाठिंबा देणारी एखादी पोस्ट सोशल मीडियावर का शेअर केली नाही, यावरदेखील मौन सोडले होते. आता एका मुलाखतीत शिल्पा शिरोडकरने लग्नानंतर सलूनमध्ये काम केले होते, असा खुलासा केला आहे.
काय म्हणाली अभिनेत्री?
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने नुकतीच ‘बॉलीवूड बबल’ला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्रीने लग्नानंतर तिचे आयुष्य कसे होते, यावर वक्तव्य केले. शिल्पा शिरोडकरने म्हटले, “लग्नानंतर मी माझ्या पतीसह एक वर्ष नेदरलँडला राहत होते. त्यावेळी तो शिक्षण घेत होता. आमचे अरेंज मॅरेज होते. एक वर्ष नेदरलँडमध्ये राहिल्यानंतर आम्ही न्यूझीलंडमध्ये स्थायिक झालो. त्यानंतर मी हेअर ड्रेसिंगचा कोर्स केला. सलूनमध्ये काम केले. कारण- मला घरी राहायचे नव्हते. आठवड्याच्या शेवटी म्हणजेच वीकेंडला सलूनमध्ये क्लायंट्सची गर्दी असायची. त्यामुळे खूप काम असायचे. सुरुवातीला मी इंटर्न म्हणून काम करीत होते. त्यामुळे पडलेले केस काढणे, वापरलेले टॉवेल स्वच्छ करणे अशी कामे मला करायला लागायची.
पुढे हे काम का सोडले याचा खुलासा करताना अभिनेत्रीने म्हटले, “माझा नवरा बँकेत कामाला होता. त्याला वीकेंडला सुट्टी असायची. मी मात्र काम जास्त असल्याने त्याच दिवशी व्यग्र असायचे. आम्हाला एकत्रित वेळ मिळत नव्हता. त्यामुळे मी ते काम सोडलं. त्यानंतर मी एका कंपनीत क्रेडिट कंट्रोलर म्हणून दीड वर्ष काम केलं. ग्लॅमरच्या दुनियेत काम केल्यानंतर अशीही कामं केली आहेत. मी सतत प्रगती करत राहिल्यामुळे मला माझा अभिमान वाटतो.”
आणखी एका मुलाखतीत शिल्पा शिरोडकरने म्हटले की, यशाच्या शिखरावर असताना लग्न केले. कारण- मला त्यावेळी ते करायचे होते. त्याचा मला पश्चात्ताप नाहीये. मी लग्नानंतर अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. मात्र, मला पुनरागमन करायचे असेल, तर ते मी नक्की करेन.
दरम्यान, अभिनेत्रीने करिअरच्या शिखरावर असताना लग्नगाठ बांधली. २००० साली अप्ररेश रंजीत यांच्याबरोबर अभिनेत्रीने लग्न केले. आता शिल्पा शिरोडकरने पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात काम करायचे असल्याचे अनेकदा म्हटले आहे. आता बिग बॉसनंतर अभिनेत्री कोणत्या चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठऱणार आहे.