Sanjay Nirupam on Saif Ali Khan: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चोरट्याने चाकूहल्ला केल्यानंतर त्याच्यावर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तब्बल पाच दिवस उपचार घेतल्यानंतर सैफ अली खान काल (दि. २१ जानेवारी) आपल्या घरी परतला. गाडीतून उतरून चालत तो आपल्या इमारतीमध्ये जातानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एक्सवर त्यांनी सविस्तर पोस्टही टाकली आहे. अडीच इंचाचा चाकू सैफच्या पाठीत रुतून बसला होता. त्याच्यावर सहा तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली. तरीही अवघ्या पाच दिवसांत तो इतका फिट कसा काय झाला? असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे.
१६ जानेवारी रोजी बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम (३०) हा सैफ अली खानच्या घरात मध्यरात्री शिरला. त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसखोरी केल्याची कबुली दिली. रात्री सैफच्या घरातील मदतनीस यांच्याशी झटापट झाल्यानंतर सैफ अली खान आणि मोहम्मद शरीफुल इस्लाम यांच्यातही झटापट झाली. ज्यात सैफ अली खानच्या शरीरावर सहा वार झाल्याचे सांगितले गेले. पाच दिवस लिलावती रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर काल सैफ अली खान घरी परतला. यावेळी त्याने जीन्स व पांढरे शर्ट घातले होते. त्याच्या हाताला पट्टी बांधलेली दिसत होती. यावेळी सैफला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. चाहत्यांना हात दाखवत तो आपल्या घरी गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
संजय निरुपम काय म्हणाले?
संजय निरुपम यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “सैफ अली खानच्या पाठीत २.५ इंचाचा चाकू घुसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात गेल्यावर पाठीत रुतलेला चाकू काढण्यात आला. सहा तास शस्त्रक्रिया सुरू होती. पाच दिवसांत उपचार घेऊन सैफ अली खान इतका फिट कसा?”
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय निरुपम म्हणाले की, मला लिलावती रुग्णालयावर प्रश्न उपस्थित करायचे नाहीत. पण त्या रात्री नेमके काय झाले? हे सर्वांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. रुग्णालयात आणताना सैफ अली खानची नेमकी परिस्थिती कशी होती? त्याच्यावर किती काळ शस्त्रक्रिया चालली. हे सर्व जनतेला कळले पाहीजे.
पकडलेला आरोपी नेमका बांगलादेशी आहे का?
वृत्तवाहिनीशी बोलताना संजय निरुपम म्हणाले की, या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली. तिसरा आरोपी हाच खरा आरोपी असून तो बांगलादेशी नागरिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांचा हा दावा खरा आहे ना? कारण मुंबई शहरात बांगलादेशी घुसखोरांचा मोठा प्रश्न आहे. जर आरोपी बांगलादेशी नागरिक असेल तर मुंबई पोलिसांना नव्याने अभियान सुरू करावे लागेल आणि बांगलादेशींना त्यांच्या देशात पुन्हा हुसकून लावावे लागेल. तरच मुंबईला सुरक्षित राखता येईल.