बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे फक्त भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. विशेषतः पाकिस्तानमध्ये शाहरुखचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेकदा पाकिस्तानी चाहत्यांमध्ये शाहरुख खानची क्रेझ दिसून येते. आताही पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरने शाहरुख खानच्या चाहत्यांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यात शाहरुखचा एक पाकिस्तानी चाहता त्याचा डायलॉग बोलताना दिसत आहे. पण यावर शोएबने त्या चाहत्याला अशी काही प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. नुकताच एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शोएब अख्तर कारमधूनच पाकिस्तानी चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. यावेळी सेमीफायनलसाठी पात्र ठरलेल्या बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघासाठी उत्साही चाहत्यांनी त्यांच्या शुभेच्छा दिल्या पण याचवेळी फरहान नावाच्या एका चाहत्याने शाहरुख खानसाठी प्रेम व्यक्त करत त्याचा एका डायलॉग बोलून दाखवला.
आणखी वाचा- “माफ करा…” सलमान खानबद्दलचा प्रश्न विचारताच शाहरुख खानने दिली प्रतिक्रिया
या व्हिडीओमध्ये तो चाहता शाहरुखच्या १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बादशाह’ चित्रपटातील डायलॉगची मिमिक्री केली. पण त्याचा हा डायलॉग ऐकल्यानंतर शोएबने विनोदी अंदाजात त्याला उत्तर दिलं. चाहत्याचा डायलॉग मध्येच थांबवत शोएब म्हणाला, “बाळा, शाहरुख खान एवढे लांबलचक डायलॉग नाही बोलत.” हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना, “जनतेचा आवाज, पाकिस्तानी क्रिकेट संघाला सल्ले आणि शाहरुख खानसाठी प्रेम.” असं कॅप्शन दिलं आहे.
आणखी वाचा- ‘बॉयकॉट’ ट्रेंडचा ‘पठाण’ला बसणार फटका? चित्रपटावर होतेय बहिष्कार घालण्याची मागणी, जाणून घ्या कारण…
दरम्यान आता ग्रुप १ मधील पहिला संघ हा ग्रुप २ मधील दुसऱ्या संघाशी ९ नोव्हेंबरला पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात भिडणार आहे. तर उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामना हा ग्रुप २ मधील पहिला संघ आणि ग्रुप १ मधील पहिला संघ यांच्यात १० नोव्हेंबरला होणार आहे. म्हणजेच न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान आणि भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीतील सामने रंगणार आहेत.