Viraj Ghelani Comment on Shahrukh Khan Jawan Movie: शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सप्टेंबर २०२३ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात १००० कोटींहून जास्त कमाई केली होती. अॅटलीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात काम करणं हा आतापर्यंतचा वाईट अनुभव होता, असं अभिनेता विराज घेलानीने म्हटलं आहे. जवळपास १० दिवस भर उन्हात चित्रपटासाठी शूटिंग केलं होतं, पण मूळ चित्रपटात त्यातला बराच भाग वापरला नाही, असंही विराजने म्हटलंय.
विराजने ‘द हॅविंग सेड दॅट शो’मध्ये हजेरी लावली. यावेळी त्याला ‘जवान’मधील त्याच्या कॅमिओबद्दल विचारण्यात आलं. त्यावर “त्याबद्दल बोलूच नका,” असं उत्तर त्याने दिलं. तसेच शिवी देत “हा चित्रपट मी का केला?” असंही तो म्हणाला. विराजने सांगितलं की हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचे अनेक फॉलोअर्स त्याला भेटले आणि त्याच्या कामाचं कौतुक केलं. “ज्यांनी माझ्यासाठी हा चित्रपट पाहिला, ते लोक खूप चांगले आहेत. ते मला भेटतात आणि चित्रपटात तुला पाहिलं, असं सांगतात. पण हा चित्रपट करणे हा माझा आतापर्यंतचा सर्वात वाईट अनुभव होता,” असं तो म्हणाला.
‘जवान’च्या सेटवरील अनुभव
कारण विचारलं असता विराज घेलानी म्हणाला की अशा चित्रपटांमध्ये पुरेशी स्टार पॉवर असते त्यामुळे ते कंटेंट क्रिएटर्सना गांभीर्याने घेत नाहीत. “गोष्ट अशी आहे की… ते तुम्हाला गांभीर्याने घेत नाहीत कारण त्यांच्याकडे संजय दत्त, शाहरुख खान आहेत,” असं विराज म्हणाला. नंतर त्याने ‘जवान’ सेटवरील वर्क कल्चरबद्दल माहिती दिली. “इथे उभा राहा, हे कर,” असं ते बोलायचे असं विराजने सांगितलं. बोलण्याची ही पद्धत चुकीची होती, असं विराजला वाटतं.
विराजने चित्रपटात पोलिसाची भूमिका केली होती. त्याने सांगितलं की शूटिंग करताना क्लोजअप शॉटसाठी त्याला प्रॉप गन (शूटिंगसाठी वापरण्यात येणारी बंदूक) देण्यात आली होती पण वाइड शॉट दरम्यान त्याला पुन्हा प्रॉप गन देण्यात आली नाही. “एक सीन होता, त्यात क्लोज अपमध्ये माझ्याकडे बंदूक असते, कारण मी एक पोलीस आहे आणि नंतर वाइड शॉटसाठी शूट करताना बंदूक दिली नाही. मग मी म्हटलं की माझ्याकडे बंदूक नाही. त्यावर ते म्हणाले, ‘बंदूक तुला मिळेल, तू इथे उभा राहा.’ मी तिथेच थांबलो पण मला बंदूक दिलीच नाही,” असं विराज म्हणाला.
१० दिवस शूटिंग केलं पण…
त्याच्या जवळच्या मित्रांनी ‘जवान’ सिनेमा पाहिलाच नाही, असं विराजने सांगितलं. “सिनेमात मी आलो आणि गेलो. मी बॅकग्राउंडमधील फक्त एक ब्लर फोटो होतो. शूटिंग करताना माझे डायलॉग होते. मे महिन्याच्या उन्हात मी मढ आयलंडमध्ये १० दिवस शूटिंग केलं होते. मग अचानक मी सिनेमात पाहिलं की आम्ही इतके दिवस जे शूट केलं, त्यातलं काहीच वापरलं नव्हतं. आम्ही पहिल्या दिवशी सुरुवातीच्या अर्ध्या तासात जे शूट केलं तेच वापरलं,” असं तो म्हणाला.