Stree 2 box office collection day 2: श्रद्धा कपूर व राजकुमार राव यांच्या ‘स्त्री २’ चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले होते, त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीही दमदार कमाई केली आहे. चित्रपट लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल असं दिसत आहे.
‘स्त्री २’ने गुरुवारी पहिल्याच दिवशी भारतात तब्बल ६०.३ कोटी रुपयांची कमाई केली. यात बुधवारच्या पेड प्रिव्ह्यूच्या कमाईचाही समावेश आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जबरदस्त गल्ला जमवला आणि २०२३ मधील ‘अॅनिमल’ व ‘पठाण’च्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनला मागे टाकलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली. शुक्रवारी चित्रपटाने ३० कोटींचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाची दोन दिवसांची एकूण कमाई ९०.३ कोटी रुपये झाली आहे. चित्रपट आज १०० कोटींचा टप्पा ओलांडेल असं या आकड्यांवरून दिसत आहे.
‘स्त्री’ नंतर सहा वर्षांनी आला ‘स्त्री २’
गुरूवारी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी होती, त्यानंतर शुक्रवार कामकाजाचा दिवस होता, त्यामुळे या चित्रपटाची हिंदी भाषेतील ऑक्युपेन्सी ४५.३१ टक्के होती. या चित्रपटात श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), राजकुमार राव (Rajkummar Rao), अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘स्त्री’ २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता, त्यानंतर सहा वर्षांनी ‘स्त्री २’ प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा या चित्रटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जॉन अब्राहमचा ‘वेदा’ की अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’, कोणत्या सिनेमाने मारली बाजी? जाणून घ्या
‘वेदा’ व ‘खेल खेल में’च्या कमाईत मोठी घसरण
‘स्त्री २’ बरोबर १५ ऑगस्ट रोजी ‘खेल खेल में’ आणि ‘वेदा’ (Vedaa Box Office Collection) हे चित्रपट प्रदर्शित झाले, दोन्ही चित्रपटांनी पहिल्या दिवशी पाच कोटींहून जास्त कमाई केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी दोन्हीच्या कमाईत मोठी घट दिसून आली. अक्षय कुमारच्या ‘खेल खेल में’ने (Khel Khel Mein Box Office Collection) दुसऱ्या दिवशी १.९ कोटी रुपये कमावले, त्याचे एकूण कलेक्शन ६.९५ कोटी रुपये झाले, तर जॉन अब्राहमच्या ‘वेदा’ने दुसऱ्या दिवशी फक्त १.६ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाची एकूण कमाई ७.९ कोटी रुपये झाली आहे. ‘वेदा’ आणि ‘खेल खेल में’ व्यतिरिक्त, डबल इस्मार्ट (तेलुगु), थंगालन (तमिळ), आणि मिस्टर बच्चन (तेलुगु) यांसारखे प्रादेशिक चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाले आहेत. या सर्व चित्रपटांमध्ये श्रद्धा कपूरच्या स्त्री २ ने बाजी मारली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd