बॉलिवुड स्टार्स कधी मराठी बोलताना दिसले तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. आणि बॉलिवूड कलाकारांना चांगलं मराठी बोलता येतं. यातलीच एक म्हणजे श्रद्धा कपूर. आतापर्यंत अनेक कार्यक्रम सोहळ्यांमध्ये ती चांगलं मराठी बोलताना दिसून आली आहे. आता ती इतकं चांगलं मराठी कशी काय बोलते याचं गुपित तिने सांगितलं आहे.
श्रद्धा कपूरला मराठी संस्कृतीबद्दल, मराठी भाषेबद्दल नेहमीच गोडी वाटत आली आहे. बोलणं असो, वेशभूषा असो अथवा खाद्यपदार्थ; अनेकदा ती तिच्या कृतीतून तिला मराठी संस्कृतीबद्दल वाटणारं प्रेम दाखवत असते. आतापर्यंत अनेकदा तिच्या मराठी बोलण्याचं कौतुक केलं गेलं आहे. आता नुकतंच एका मुलाखतीमध्ये तिने तिला मराठी येण्याबद्दलचं मुख्य कारण सांगितलं.
डॅनी पंडितने त्याच्या यूट्यूब चॅनलवर श्रद्धा बरोबरचा एक व्हिडीओ पोस्ट केला. या संपूर्ण व्हिडीओमध्ये ती मराठीत बोलताना दिसत आहे. “तुला इतकं चांगलं मराठी कसं येतं?” असं विचारल्यावर ती म्हणाली, “कारण मी कॉकटेल आहे. मी अर्धी पंजाबी आहे आणि अर्धी मराठी आहे. मला पंजाबी बोलता आलं असतं तर बरं झालं असतं असं मला नेहमी वाटतं. पण मला ते तितकं चांगलं बोलता येत नाही. मला तोडकमोडकं पंजाबी बोलता येतं. पण मला माझं मराठी देखील आणखीन सुधारायचं आहे.”
श्रद्धा नुकतीच पुण्याला गेली होती तेवहाचा हा व्हिडीओ आहे. यावेळी श्रद्धाने पुण्यातील प्रसिद्ध मिसळीचा आस्वाद घेतला. त्याचबरोबर तिने पुण्यात गेल्यावर वडापावही खाल्ला होता. तिने केलेला हा पुणे दौरा खूपच चर्चेत आला होता.