अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘स्त्री २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करीत रेकॉर्ड तयार करणाऱ्या रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाला मागे टाकत ‘स्त्री २’ने नवा विक्रम केला आहे. सोमवारी या चित्रपटाने ६.५ कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.

श्रद्धा कपूरचा ‘स्त्री २’ रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’पेक्षा पुढे

‘स्त्री २’ या चित्रपटाने १९ दिवसांत ५०८ कोटी रुपयांची कमाई केली असून, त्या तुलनेत संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने ५०५ कोटी रुपयांची कमाई केली होती. जगभरात श्रद्धा कपूरच्या चित्रपटाने ७०० कोटींची कमाई करीत दुसरे स्थान पटकावले आहे. सर्वांत जास्त म्हणजे १००० कोटी रुपयांची कमाई प्रभासच्या ‘कल्की : २८९८ एडी’ या चित्रपटाने केली आहे.

आता येत्या काही दिवसांत ‘स्त्री २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड तयार करील, असे म्हटले जात आहे. एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली २ : द कनक्लुजन’ यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५११ कोटी रुपयांची कमाई केली होती. आता हा आकडा ‘स्त्री २’ लवकरच पार करेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्याबरोबरच जर ‘स्त्री २’ने याच गतीने कमाई केली, तर हा चित्रपट पुढच्या आठवड्याच्या अखेरपर्यंत शाहरुख खान आणि सनी देओलच्या मोठी कमाई करणाऱ्या चित्रपटांना मागे टाकेल, असे म्हटले जात आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने ५२४.५३ कोटी रुपयांची कमाई केली होती; तर सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटाने ५२५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

हेही वाचा: “घृणास्पद कृत्य घडत असताना ‘मला फोटो काढू द्या’ असं पीडितांनी म्हणायचं का?” पुराव्यांबद्दल ज्येष्ठ अभिनेत्रीचा सवाल

या महिन्यात कोणतेही मोठे चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याने ‘स्त्री २’साठी ही मोठी सुवर्णसंधी असणार आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोणते नवीन रेकॉर्ड करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दरम्यान, ‘स्त्री २’ हा चित्रपट अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केला असून, श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव त्यात मुख्य भूमिकांत दिसत आहेत. त्याबरोबरच पंकज त्रिपाठी, तमन्ना भाटीया, वरुण धवन, अक्षय कुमार, अपारशक्ती खुराना हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसत आहेत.

Story img Loader