‘स्त्री २’ या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या चर्चांचा भाग बनली आहे. सोशल मीडियावर श्रद्धा कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने केलेल्या कृतीमुळे नेटकरी तिचे कौतुक करताना दिसत आहेत.
इन्स्टाग्रामवर ‘फिल्मीज्ञान’ने श्रद्धा कपूरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला तिला केक भरविताना दिसत आहे. ती त्यातला थोडासा केक घेते आणि बाकीचा त्या महिलेला भरवते. त्यानंतर ती हात जोडून ‘थँक्यू’ म्हणताना दिसत आहे. याबरोबरच तिने या महिलेची गळाभेटदेखील घेतली आहे. हे सर्व पाहिल्यानंतर चाहते भारावून गेल्याचे कमेंट्समधून दिसत आहे.
काय म्हणाले नेटकरी?
श्रद्धा कपूरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकमिश्रित कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एक नेटकऱ्याने म्हटले, “ती खूप दयाळू आहे.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, “यामुळेच ती सगळ्यांची आवडती आहे.” आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, ” बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रेमळ हृदयाची, पाय जमिनीवर असणारी मुलगी.”
एका नेटकऱ्याने श्रद्धा कपूरचे वडील म्हणजेच अभिनेते शक्ती कपूर यांचे कौतुक केले आहे. या व्हिडीओवर कमेंट करीत नेटकऱ्याने लिहिले, “चित्रपटात शक्ती कपूर यांनी भलेही नकारात्मक काम केले असू देत; मात्र खऱ्या आयुष्यात त्यांनी सकारात्मक भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने निभावली आहे. हे श्रद्धा कपूरच्या संस्कारांतून दिसत आहे.”
“कोणी इतके सुंदर कसे असू शकते”, “ती फक्त दिसायलाच सुंदर नाही, तर हृदयानेदेखील सुंदर आहे. देव कायम तिला असेच ठेवू दे”, “यामुळेच श्रद्धाला खूप प्रेम मिळते आणि ती सगळ्यात जास्त फॉलोअर असणारी अभिनेत्री आहे,” असे म्हणत नेटकऱ्यांनी श्रद्धा कपूरचे कौतुक केले आहे.
श्रद्धा कपूरच्या कामाबद्दल बोलायचे तर, ती नुकतीच ‘स्त्री २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. भारतात सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी तो एक ठरला आहे. ‘स्त्री २’ हा चित्रपट अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केला असून, श्रद्धा कपूरबरोबर राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसत आहेत. त्याबरोबरच पंकज त्रिपाठी, तमन्ना भाटिया, वरुण धवन, अक्षय कुमार, अपारशक्ती खुराना हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकांत आहेत.
दरम्यान, श्रद्धा कपूर चित्रपटांबरोबरच सोशल मीडियावरही सक्रिय असते. चाहत्यांकडून अभिनेत्रीला मोठे प्रेम मिळत असल्याचे पाहायला मिळते.