करण जोहर सध्या त्याच्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत. आज या चित्रपटातील ‘तुम क्या मिले’ हे पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं. परंतु आता या गाण्यावरून श्रेया घोषालचे चाहते करण जोहरवर चांगलेच नाराज झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये ‘तुम क्या मिले…’ या गाण्याची एक छोटीशी झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या गाण्याच्या शब्दांनी आणि चालीने तेव्हाच प्रेक्षकांना आकर्षित केलं होतं. तेव्हापासून हे गाणं कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर हे गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं. मात्र हे गाणं समोर येताच करणने चित्रपटामध्ये श्रेया घोषालला डावललं असं तिचे चाहते म्हणून लागले आहेत.
आणखी वाचा : “…पण त्याला थोडं कमी लेखलं गेलं,” करण जोहरने रितेश देशमुखसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
करणने नुकताच या गाण्याचा एक टीझर शेअर केला. यामध्ये त्याने ड्रीम टीम असं लिहीत करण जोहर, प्रीतम, अमिताभ भट्टाचार्य आणि अरिजीत सिंह यांची नावं लिहिली. परंतु श्रेया घोषालनेही हे गाणं गायलं असून या यादीमध्ये तिचं नाव कुठेही दिसलं नाही. त्यामुळे आता नेटकरी करण जोहरवर टीका करू लागले आहेत. या पोस्टवर कमेंट करत एकाने लिहिलं, “यामध्ये श्रेया घोषालचं नाव कुठे आहे?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “या गाण्याची सुरुवात गायिकेच्या आवाजाने होते. तरी तू त्यासाठी तिला क्रेडिट दिलं नाहीस. हे तू खूप चुकीचं केलंस.” तर तिसरा नेटकरी म्हणाला, “गायिकेला क्रेडिट न देणं ही आता त्याची सवय बनली आहे.” तर आणखी एकाने लिहिलं, “तू श्रेयाला क्रेडिट दे नाहीतर नको देऊस, या गाण्याच्या सुरुवातीला तिने जी तान घेतली त्यावरूनच आम्ही तिला ओळखलं. ती सर्वोत्कृष्ट आहे आणि तिचा आवाज आमच्या हृदयात आहे. तिला तुझ्याकडून वेगळं क्रेडिट मिळण्याची गरजच नाही.”
त्यामुळे आता या ड्रीम टीममुळे करण जोहर चांगलाच ट्रोल होत आहे. श्रेया घोषालला क्रेडिट न दिल्याने नेटकरी त्याच्यावर टीका करू लागल्यानंतर त्याने या पोस्टच्या कमेंट लिमिटेड केल्या. करण जोहरचा हा आगामी चित्रपट २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.