Shreya Ghoshal Birthday: आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी अभिनेत्री म्हणजे श्रेया घोषाल. आज ती तिचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. आतापर्यंत विविध भाषांमध्ये तिन्ही हजारो गाणी गायली आहेत. तिच्या गाण्यांबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते. २०१५ मध्ये तिने शिलादित्य मुखोपाध्यायशी लग्न केलं. भारतातील आघाडीची गायिका असूनही तिने कुठल्याही गायकाशी लग्ना न करता वेगळ्या क्षेत्रातील व्यक्तीची आपला पती म्हणून निवड केल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. याचं कारण तिने एका मुलाखतीत उघड केलं होतं.
श्रेया आणि शिलादित्य एकमेकांचे बालपणीचे मित्र मैत्रीण आहेत. शिलादित्य इंजिनियर आहे. तब्बल १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाबद्दल कळतात अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याचं कारण म्हणजे श्रेयाचा पती संगीत क्षेत्रातील नाही. तिने संगीत क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न का केलं नाही त्याचं कारण तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
आणखी वाचा : इलियाना डिक्रुझला तमिळ सिनेसृष्टीतून केलं बॅन? अखेर सत्य आलं समोर
ती म्हणाली होती, “मी जर एखाद्या गायकाशी लग्न केलं असतं तर मला व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात त्याच-त्याच गोष्टी ऐकाव्या लागल्या असत्या. मला आयुष्यात काहीतरी बदल हवा होता. दुसऱ्या क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न केल्याने निदान इतर विषय समजून घ्यायला मिळतात. आयुष्यात एकसुरीपणा येत नाही.” तेव्हा तिच्या या उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होतं. त्याचबरोबर सर्वांनाच वेगळा विचार करायला भाग पाडलं होतं.
दरम्यान श्रेया तिच्या वैयक्तिक आयुष्यातील देखील घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. आता श्रेया आणि शिलादित्य यांना एक गोंडस मुलगाही आहे.