बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल कायम तिच्या गाण्यांमुळे चर्चेत असते. विविध चित्रपटांसाठी तिने गायलेली अनेक गाणी सुपरहिट झाली आहेत. श्रेयाचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. ५ फेब्रुवारी २०१५ रोजी तिने शिलादित्य मुखोपाध्यायबरोबर लग्न केलं. या दोघांच्या लग्नाला आता १० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त श्रेयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
पतीला लग्नाच्या दहाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना श्रेयाने सोशल मीडियावर तिचे आणि तिच्या पतीचे लग्नातील काही सुंदर फोटो पोस्ट केलेत. दहा वर्षे जुने फोटो पोस्ट करून तिने तिच्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. यातील पहिल्या फोटोत श्रेया आणि शिलादित्य दोघेही लग्नाचे काही विधी पूर्ण करताना दिसत आहेत, तर दुसऱ्या एका फोटोमध्ये श्रेया आणि शिलादित्य जेवत आहेत. जेवताना श्रेयाचा पती तिला घास भरवत आहे.
आणखी एका फोटोमध्ये दोघांनी सुंदर पोशाख परिधान करत कॅमेऱ्यासमोर पोज दिली आहे. लग्नातील फोटोंच्या या जुन्या आठवणी शेअर करत श्रेयाने यावर सुंदर कॅप्शनही लिहिलं आहे. यावर तिने लिहिलं, “आजही आम्हाला या दिवसाची अशी आठवण येते, जणू काही कालच हे सर्व घडलं आहे. आम्ही दोघांनी एकमेकांना मिळवल्याने आम्ही स्वत:ला फार भाग्यवान समजतो.”
“या प्रवासात आम्ही मोठे होत आहोत. तसेच दोघेही एकमेकांवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त करत आहोत. देवाने आम्हाला याहूनही मोठा आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या आयुष्यात माझा मुलगा देवयान आला, त्यामुळे आता आमच्याकडे जे काही आहे त्यासाठी आम्ही आभारी आहोत.”
श्रेयाच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने सकाळपासून अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कुटुंबातील व्यक्ती आणि मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे श्रेयाने पोस्टमध्ये या सर्वांचेही आभार व्यक्त केलेत. तिने शेवटी लिहिलं, “तुम्ही सकाळपासून पाठवलेल्या अनेक सुंदर शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल आम्ही सर्व चाहते आणि मित्रांचे आभार मानतो.”
श्रेया घोषाल आणि शिलादित्य मुखोपाध्याय दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. मैत्रीच्या नात्याला त्यांनी २०१५ मध्ये पती पत्नीचं नातं जोडलं आणि लग्नगाठ बांधली. त्यानंतर २०२१ मध्ये तिने आपल्या बाळाला जन्म दिला. श्रेया तिच्या कुटुंबीयांसह सुखी आयुष्य जगत आहे.
श्रेयाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, १९९६ मध्ये ती ‘सा रे ग म पा’ शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. आपल्या मधुर आवाजाने ती या शोची विजेतीही ठरली. बॉलीवूडमध्ये ‘देवदास’ चित्रपटातील ‘बैरी पिया’, ‘सिलसिला ये चाहत का’, ‘मोरे पिया’, ‘डोला रे डोला’ ही गाणी तिने गायली. पहिल्याच चित्रपटातील तिची सर्वच गाणी तुफान गाजली. त्यानंतर श्रेयाने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.