FIR against Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यावर फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. हरियाणातील सोनीपत येथील मुरथल पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरनुसार, २२ जानेवारी २०२५ रोजी नोंदवलेल्या या प्रकरणात १३ आरोपींची नावे आहेत, ज्यात या दोन अभिनेत्यांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रेयस तळपदे, आलोक नाथ फसवणूक प्रकरणात अडकले

‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार या गुन्ह्यांमध्ये फसवणुकीने मालमत्ता हस्तांतरणाचा समावेश असून, भारतीय दंड संहिता कलम ३१६, ३१८ आणि ३१८(४) अंतर्गत आरोप लावण्यात आले आहेत. मुरथलचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (ACP) अजीत सिंह यांनी दोन्ही अभिनेत्यांची नावे फिर्यादीने पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात नमूद केली असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले, “मुख्य तक्रार एका संस्थेविरोधात करण्यात आली आहे. या संस्थेने लोकांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करून त्यांची फसवणूक केली आहे. श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांचा या प्रकरणात नेमका काय सहभाग आहे, हे तपासाअंती स्पष्ट होईल.”

काय आहे तक्रार ?

सोनीपतचे रहिवासी विपुल अंतिल यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ह्यूमन वेल्फेअर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने लोकांना त्यांच्या फिक्स डिपॉझिट (FD) आणि रेकरींग डिपॉझिट (RD) योजनांवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले. या सोसायटीने मल्टी-लेव्हल मार्केटिंग प्रणालीचा वापर केला, या योजनेत अधिक गुंतवणूकदार आणणाऱ्या एजंट्सना बक्षिसे दिली.

ही सोसायटी १६ सप्टेंबर २०१६ पासून हरियाणासह इतर अनेक राज्यांमध्ये कार्यरत होती आणि ती मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी अॅक्ट, २००२ अंतर्गत नोंदणीकृत होती. परंतु, या संस्थेच्या फसव्या योजनांमुळे तिच्या कारभारावर संशय घेतला जात आहे. श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांचा या प्रकरणाशी किती संबंध आहे, याचा तपास सुरू आहे.

‘एबीपी हिंदी’ने दिलेल्या वृत्तानुसार अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांच्या पैशांची गुंतवणूक करायला सांगणाऱ्या या कंपनीचे प्रमोशन केले असा आरोप श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यावर करण्यात आला आहे.

दरम्यान, श्रेयस तळपदेचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. भारतातील १९७५-७७ च्या आणीबाणीच्या काळावर आधारित या चित्रपटात श्रेयसने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे . तर, आलोक नाथ यांनी १९८२ मध्ये डेब्यू केल्यापासून ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas talpade and alok nath and booked in fraud case know what is the case psg